काही खासदार अजूनही आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचे मोठे विधान
शिवसेनेचे काही खासदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत. तांत्रिक दृष्ट्या हे खासदार आजही शिवसेनेतच असून, त्यांनी अद्याप पक्ष सोडल्याचे जाहीर केलेले नाही, असा मोठा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काही खासदारांनी आपल्याशी संपर्क साधून ‘गैरसमज होत असून आपण अजूनही शिवसेनेसोबतच आहोत’ असे सांगितल्याचे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून या खासदारांसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अधिकृत निर्देश समोर आलेले नाही. ते ज्य़ा गटात जाऊ इच्छित आहेत त्या मिंधे गटाकडूनही हे खासदार आमच्याकडे येणार असं कोणतही वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आत्तापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे, असं जाहीर केलेलं नाही. हे खासदार व्हीपचं उल्लघन करून बैठकीला उपस्थित राहिले नाही हे खरं असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हा निव्वळ एक तांत्रिक मुद्दा असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.
काही खासदारांना त्यांच्या मतदारसंघाची भीती वाटतेय. कारण लोकांना त्यांच्याबद्दल रोष आहे. ज्या खासदारांनी शिवसेनेला संपर्क केलेला आहे आणि ज्यांनी सांगितय की, काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही आजूनही शिवसेनेसोबत आहोत. अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी ते शिवसेनेचा त्याग केल्याचे जाहीर करतील, त्या क्षणी आमचे संबंध पूर्णपणे तुटतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे दौरे
ईशान्य मुंबईच्या खासदारांनी केलेल्या बेईमानीचा समाचार घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज स्वतः ईशान्य मुंबईत कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. यानंतर 27, 28 आणि 29 तारखेला ते सर्व बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. हा दौरा नागपूर आणि यवतमाळपासून सुरू होऊन शिर्डीला संपेल. यामध्ये धाराशिव, हिंगोली आणि परभणीचाही समावेश आहे. ज्या खासदारांना आपली चूक किंवा गफलत झाल्याचे जाणवत आहे आणि जे संपर्क साधत आहेत, त्यांच्याशी यावेळी चर्चा नक्की होईल, असे संजय राऊत म्हणाले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओमराजे निंबाळकरांनी आत्तापर्यंत एकदाही मी शिवसेना सोडतोय असे सांगितलेले नाही. मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मग माझ्याविषयी अशा बातम्या का प्रसिद्ध होत आहेत. मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्थ असल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाही, असे विधान त्यांनी काल केले आहे. त्यामुळे पक्ष म्हणून त्यांच्याशी अशाच इतर संवाद सुरू असलेल्या खासदारांशी चर्चा करायला काही हरकत नसल्याचे संजय राऊतांनी सांगितले.
निधीचे आमिष आणि कमिशनचा मोह!
सध्याच्या राजकारणात प्रत्येकाचा विषय पैसा आणि निधी हाच झाला आहे. पण निधी हे पक्ष फुटण्याचे कारण असू शकत नाही. अन्यथा मधू दंडवते, मधू लिमये किंवा जॉर्ज फर्नांडिस कधीच फुटले असते. उमेदवारी मागताना शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि इथे संघर्ष करावा लागणार हे सर्वांना ठाऊक असते. मग निवडून आल्यावरच सत्तेची उब कशाला हवी? विरोधी पक्षात राहून जनतेचा आवाज बनणे ही सन्मानाची गोष्ट आहे. पण दुर्दैवाने 200 ते 500 कोटींच्या निधीचे आमिष आणि त्यातून मिळणाऱ्या 50 कोटींच्या कमिशनच्या मोहात खासदार अडकतात, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
गद्दारांना पक्षात घेऊन त्यांचा मान-सन्मान करण्यापेक्षा, जर एखादा कार्यकर्ता किंवा नेता चुकला असेल, त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल आणि त्याने माफी मागितली असेल, तर राजकारणात मोठे मन करून ते स्वीकारले पाहिजे, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
Comments are closed.