तामिळनाडूत वायू गळती ; 7 महिला कामगारांचा मृत्यू – TMarathiNews

सी-फूड युनिटमध्ये अमोनिया गळती : 65 हून अधिक कामगार अत्यवस्थ, काहींची प्रकृती गंभीर

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिह्यातील एका सी-फूड निर्यात युनिटमध्ये रविवारी अमोनिया वायू गळती झाली. या अपघातात 7 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 65 हून अधिक जण अत्यवस्थ आहेत. अत्यवस्थ असलेल्यांपैकी नऊ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अराक्कोनम येथील एनडीआरएफ पथकाला सतर्क करण्यात आले. वायू गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित परिसर सुरक्षित करण्यासाठी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पेरियापलायमजवळील कनिगैपैर येथील सेंट पीटर्स पॉल सी-फूड्स एक्सपोर्ट्स कारखान्यात ही गळती झाली. या घटनेनंतर एनडीआरएफच्या 30 जवानांचे एक विशेष पथक तात्काळ चेन्नईहून रवाना करण्यात आले. अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असलेले एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हे पथक वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई), वायू शोधक उपकरणे आणि रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक (सीबीआरएन) आपत्ती हाताळण्यासाठीच्या विशेष उपकरणांनी सुसज्ज आहे.

नऊ रुग्णांना चेन्नईला रेफर

या घटनेमध्ये बाधित झालेल्यांपैकी वेल्स रुग्णालयात 46 आणि व्यंकटेश्वरा रुग्णालयात 21 रुग्णांना दाखल करण्यात आले. गंभीर आजारी असलेल्या नऊ रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी रुग्णवाहिकेने चेन्नईतील शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती तिरुवल्लूरच्या जिल्हाधिकारी एस. कविता यांनी दिली. बाधित झालेल्या बहुतेक कामगार 24 ते 25 वयोगटातील तरुण महिला होत्या. रुग्णांच्या नाडी आणि रक्तदाबावर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक रुग्णांचा रक्तदाब कमी असला तरी, त्यांचे तरुण वय पाहता ते बरे होण्याची शक्यता आहे.

चौकशी समिती स्थापन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या तीन सदस्यीय समितीत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक यांचा समावेश आहे. समितीला 24 तासांच्या आत अंतरिम अहवाल आणि तीन दिवसांच्या आत अंतिम अहवाल सादर करायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री/तिरुवल्लूरचे प्रभारी मंत्री यांना देखरेख अधिकारी डॉ. के. पी. कार्तिकेयन यांच्यासह तात्काळ तिरुवल्लूरला पोहोचण्याचे आणि जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने बाधित लोकांना सर्वतोपरी मदत व काळजी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यपाल आर्लेकर यांच्याकडून आढावा

तामिळनाडू लोक भवनने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.s राज्यपाल आर्लेकर यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर शोकभावना व्यक्त केल्या. तिरुवल्लूर जिह्यातील पेरियापलायमजवळील कनिगैपैर गावातील कारखान्यात झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या दु:खद घटनेने मी खूप व्यथित झालो आहे. या घटनेत अनेक लोकांचा बळी गेला आणि अनेक कामगार अत्यवस्थ झाले. या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या कुटुंबियांप्रति मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात त्यांना शक्ती आणि धैर्य मिळो, अशी मी प्रार्थना करतो. तसेच, उपचार घेत असलेल्या सर्वांच्या शीघ्र आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो, असे राज्यपालांनी नमूद केले आहे.

Comments are closed.