हिंमत असेल तर ईशान्य मुंबईतून पुन्हा उभे राहून दाखवा, संजय राऊत यांचे आव्हान
हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन उकिरडा फुंकायला जा. हिंमत असेल तर ईशान्य मुंबईतून पुन्हा उभे राहून दाखवा. हिंमत असेल तर शंभर मिंध्यांना घेऊन या आणि जिंकून दाखवा. येथील निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असे जाहीर आव्हान शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी यावेळी गद्दार खासदारांना दिले.
गद्दारांनी शेण खाल्ल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची भांडुपमधील ही पहिली सभा आहे, असा उल्लेख करत संजय राऊत यांनी गद्दार खासदाराचा समाचार घेतला. निष्ठा काय असते ते येथील सामान्य शिवसैनिकांकडून गद्दारांनी शिकायला पाहिजे. शिवसेनेने लोकांना आमदार, खासदार, नगरसेवक केले आणि त्यांनी बेईमानी केली असे अनेक जण आपल्याला सांगतात. त्यांना आपण सांगतो की, एकनिष्ठ रहायला आई नेक आणि बाप एक असावा लागतो, जे ईशान्य मुंबईतील खासदाराकडे दिसत नाही, अशी चपराक संजय राऊत यांनी लगावली.
वाय प्लस सुरक्षा असली तरी शिवसैनिक वायझेड करतील
संजय पाटील यांना मिंध्यांनी वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. पण त्यांच्या वाय प्लसची वायझेड करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. दिसेल तिथे आणि असेल तेनं हाणा अशा कोल्हापूरच्या म्हणीप्रमाणे गद्दारांशी वागा असे ते म्हणाले. ऑपरेशन टायगर केले असे भाजप म्हणते म्हणजे शिवसैनिक टायगर आहे. गद्दार लोकच लांडग्यांच्या कळपात गेले आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ईशान्य मुंबईतील पुढचा खासदार हा शिवसेनेचाच असेल असे अभिवचनही संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना दिले.
Comments are closed.