शांतता करार फसला तर होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांवर टोल लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
‘इराणसोबत झालेला शांतता करार पुढच्या 60 दिवसांत प्रत्यक्षात न आल्यास होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱया सर्व जहाजांवर टोल लावणार,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांततावार्ता सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा इशारा महत्त्वाचा आहे.
‘टथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे. इराण-अमेरिकेमध्ये झालेल्या 14 कलमी सामंजस्य करारानुसार युद्धबंदीच्या काळात होर्मुझमध्ये कोणतेही शुल्क लावले जाणार नाही. युद्धबंदीच्या 60 दिवसांच्या कालावधीत कोणताही टोल आकारला जाणार नाही आणि त्यानंतरही टोल आकारला जाणार नाही, मात्र इराणसोबतचा आमचा करार पूर्ण झाला नाही अमेरिकेकडून हा टोल लादला जाऊ शकतो. मध्य पूर्वेतील देशांचे ‘गार्डियन एंजल’ (संरक्षक देवदूत) म्हणून आम्ही हा टोल आकारू. भूतकाळातील, वर्तमानातील किंवा भविष्यातील खर्चाच्या भरपाईचा तो भाग असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आण्विक कार्यक्रमावरील चर्चा कळीची ठरणार
तब्बल 40 दिवसांच्या युद्धानंतर इराण-अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी 60 दिवसांची युद्धबंदी केली आहे. या काळात दोन्ही देश कायमस्वरूपी शांतता करारातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. त्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याचा मुद्दा आहे. ही चर्चा आजपासून स्वित्झर्लंडमध्ये सुरू होत आहे. तत्पूर्वीच, ट्रम्प यांनी पुढील संकटाचा इशारा दिला आहे.
Comments are closed.