Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यात पावसाची हजेरी, उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
कोकणातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. वरुणराजाने सोमवारी दुपारपासून संगमेश्वर तालुक्यावर आपली कृपादृष्टी केली आहे. पावसाने दमदार हजेरी लावत उकाड्याने होरपळलेल्या जनजीवनाला खूप मोठा दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत आस लावून बसलेल्या बळीराजालाही दिलासा मिळाला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिक दमट वातावरण आणि वाढलेल्या उष्णतेमुळे पुरते त्रस्त झाले होते. बालगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
शेतकरी वर्गासाठी हा पाऊस विशेष समाधानकारक ठरला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने पेरण्यांबाबत संभ्रमाचे वातावरण होते. कृषी विभागाने पेरण्या पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असला, तरी मृग नक्षत्रावर विश्वास ठेवत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरणी केली होती, त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती. सोमवारी दुपारपासून झालेल्या या दमदार पावसामुळे जमिनीला चांगला ओलावा मिळाला आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना मोठी गती मिळणार असून बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
Comments are closed.