बेस्टचा संप मिटूनही हाल कायम, कायमस्वरूपी कर्मचारी कामावर, ’मात्र ’कंत्राटीं’ची पाठ; निम्म्या बस अजूनही डेपोतच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर आर्थिक प्रश्नांच्या मुद्द्यावर पुकारलेला संप बेस्ट कामगारांच्या कृती समितीने रविवारी रात्री मागे घेतला. त्यानुसार सोमवारी बससेवा पूर्ववत सुरू होण्याऐवजी निम्म्या बसफेऱ्या रस्त्यावर धावल्या. कृती समितीच्या संप मागे घेण्याच्या घोषणेनुसार फक्त कायमस्वरूपी कर्मचारी कामावर रुजू झाले. परंतु मागण्यांबाबत असंतोष कायम राहिल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ड्युटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मुंबईकरांचा सलग चौथा दिवस गैरसोयीचा ठरला.

बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेटलीजच्या (कंत्राटी) कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर 12 कामगार संघटनांच्या बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला होता. सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेईपर्यंत संपातून माघार घेणार नाही, असा निर्धार कृती समितीने जाहीर केला होता. त्यानुसार सरकारने रविवारी कृती समितीसोबत चर्चा केली आणि बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वेतन करार होईपर्यंत मासिक 3 हजार रुपयांची, तर कंत्राटी कर्मचाऱयांना 2 हजार रुपयांची वाढ जाहीर केली. सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने कृती समितीने रविवारी रात्रीच संप मागे घेतला. त्यामुळे सोमवारी सकाळपासून बससेवा पूर्ववत रस्त्यावर धावण्याची अपेक्षा होती; परंतु कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष कायम राहिल्याने बेस्टची बससेवा सलग चौथ्या दिवशी विस्कळीतच राहिली.

तब्बल 70 ते 80 टक्के कामगारांची ‘दांडी’

मागील तीन दिवस कामगार संघटनांचे कार्यकर्ते संप यशस्वी करण्यासाठी हिरीरीने रस्त्यावर उतरले होते. मात्र सरकारकडून अपेक्षित पदरी न पडल्याच्या नाराजीतून कंत्राटी कामगार सोमवारीही कामावर आले नाही. यात ‘मातेश्वरी’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिले, तर बहुतांश कर्मचारी संपावेळी केलेल्या धावपळीमुळे थकल्याने कामावर हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे अनेक बस आगारांमध्ये 70 ते टक्के कामगारांनी ‘दांडी’ मारल्याचे चित्र होते. बेस्ट उपक्रमाने मात्र निम्म्या कर्मचाऱयांनी डय़ुटीवर हजेरी लावल्याचा दावा केला.

  • कुलाबा येथील बेस्ट भवनपासून ते उपनगरांत मुलुंड आणि गोराईपर्यंत बेस्टच्या केवळ निम्म्या बसफेऱयाच रस्त्यावर धावल्या. त्यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल झाले. टॅक्सी-रिक्षासाठी ठिकठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत होते.

तासन्तास बस नाही

बसफेऱयांचे वेळापत्रक सकाळपासून सायंकाळपर्यत विस्कळीत होते. तासन्तास बस येत नव्हती. असे असतानाही बेस्ट उपक्रमाच्या ‘चलो अॅप’मध्ये बस काही मिनिटांच्या अंतरावर आल्याचे दाखवले जात होते. त्यामुळे बस येईल या अपेक्षेने प्रवासी बस थांब्यावरच तासन्तास रखडले. अनेक बस आगारांमधून दिवसभरात 30 ते 50 टक्के बस धावल्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला. मजास बस आगारातून सकाळच्या सत्रात 100 पैकी 16 बसफेऱया चालवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष कायम असल्याने मंगळवारीही बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.