FIFA World Cup 2026 – इजिप्तचा ऐतिहासिक विजय, न्यूझीलंडवर 3-1ने मात करत मिळविले पहिले यश
मोहम्मद सलाहच्या दमदार खेळीच्या जोरावर इजिप्तने फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. न्यूझीलंडवर 3-1 गोलफरकाने मात करत इजिप्तने 92 वर्षांच्या विश्वचषक इतिहासातील पहिला विजय नोंदवला.
मोहम्मद सलाहने स्पर्धेतील आपला पहिला गोल करत इजिप्तच्या शानदार पुनरागमनात मोलाचा वाटा उचलला. सामन्याच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने आघाडी घेतली होती. 15व्या मिनिटाला फिन सर्मनने कॉर्नरवरून आलेल्या चेंडूवर अचूक हेडर मारत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱया सत्रात इजिप्तने 58व्या मिनिटाला मोहम्मद हानीच्या क्रॉसवर झिकोने हेडरद्वारे गोल करत बरोबरी साधली.
67व्या मिनिटाला सलाहने आपली जादू दाखवली. झिकोसोबतच्या सुरेख समन्वयानंतर त्याने डाव्या पायाने अचूक फटका मारला आणि इजिप्तला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 68वा गोल ठरला. 82व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या चेंडूवर त्रेझेगेटने अप्रतिम डायव्हिंग हेडर मारत तिसरा गोल नोंदवला आणि इजिप्तचा विजय निश्चित केला.
Comments are closed.