FIFA World Cup 2026 – 92 वर्षांचा हुंदका फुटला!

>> मंगेश वरवडेकर

काल नाईल नदी उलटी वाहिली. काल पिरॅमिडनेही टाळी वाजवली. काल कैरोच्या रस्त्यांवर फक्त एकच आवाज घुमत होता, मिस्र… मिस्र… इजिप्त… इजिप्त… न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलच्या मैदानावर 92 वर्षांचा दुष्काळ सोसलेल्या इजिप्तच्या ममी झालेल्या आत्म्यांनाही जणू समाधान लाभलं. इतिहासाच्या वाळूत गाडलेली स्वप्नं पुन्हा जिवंत झाली. 1934 साली वर्ल्ड कपच्या मैदानावर प्रथम पाऊल ठेवणाऱया इजिप्तचा तब्बल नऊ दशकांचा, 32,800 दिवसांचा वनवास अखेर संपला.

हा विजय अनपेक्षित होता, पण त्याहून मोठं म्हणजे तो अपरिहार्यही होता. कारण इतकी वर्षं एखाद्या राष्ट्राने आशेचा दिवा विझू दिला नव्हता. इजिप्त जिंकला… आणि तो फक्त सामना जिंकला नाही. नाईलच्या काठावरच्या प्रत्येक शेतकऱयाच्या डोळ्यातली प्रतीक्षा जिंकली. कैरोच्या प्रत्येक टॅक्सीचालकाचं स्वप्न जिंकलं.

हा विजय तीन गुणांचा नव्हता. हा विजय 92 वर्षांच्या जखमेवर ठेवलेली प्रेमाची फुंकर होती. 1934 साली इजिप्तने प्रथमच वर्ल्ड कपच्या मैदानावर पाऊल ठेवलं. आफ्रिकेतून वर्ल्ड कप खेळणारा तो पहिलाच देश होता. त्या काळात जगाला
पिरॅमिड, नाईल नदी आणि फराओंची संस्कृती माहिती होती; पण फुटबॉलच्या नकाशावर इजिप्त हा एक छोटासा ठिपका होता. त्यांनी पहिलं पाऊल टाकलं, पण विजयाचं दार उघडलं नाही. मग काळ पुढे सरकत गेला.

जगाने दोन महायुद्धं पाहिली. टीव्ही आली, इंटरनेट आले, मोबाईल आले, कृत्रिम बुद्धिमत्ता आली. फुटबॉलमध्ये पेले आले,
मॅराडोना आले, मेस्सी आणि रोनाल्डो आले. अनेक देश उंच भरारी घेत गेले, पण इजिप्तचा वर्ल्ड कप विजय मात्र येत नव्हता. एखाद्या तहानलेल्या वाळवंटाने ढगांची वाट पाहावी तशी इजिप्त वाट पाहत होती. अखेर मोहम्मद सलाहच्या पिढीने तो क्षण प्रत्यक्षात आणला. 1934 नंतर 1990, 2018 आणि आता 2026. फक्त चौथ्यांदाच मुख्य फेरी गाठणारा हा देश.

राजकीय उलथापालथ, युद्धं, क्रांती, आर्थिक संकटं… अनेकदा फुटबॉल हा चैनीचा विषय वाटू लागला. जेव्हा पोटात अन्न नव्हतं, तेव्हा चेंडू कुठून आणायचा, हा प्रश्न होता. पण तरीही फुटबॉल थांबला नाही. तो गल्ल्यांत फिरत राहिला. शाळांच्या पटांगणात उडत राहिला. नाईलच्या वाळूत लोळत राहिला. कारण काही खेळ हे फक्त खेळ नसतात. ते जगण्याची कारणं असतात.

1934 साल आठवतंय का?

तेव्हा हिटलर युरोपमध्ये डोकं वर काढत होता. गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह इतिहासात नोंदला गेला होता. त्याच काळात इटलीतील नेपल्समध्ये अब्देलरहमान फवझी नावाच्या एका तरुणाने हंगेरीविरुद्ध दोन गोल झळकवले होते. इजिप्त तो सामना 4-2 ने हरला; पण फवझीचे ते दोन गोल पुढच्या अनेक दशकांसाठी आशेचा दिवा बनले. ती ठेव होती. ती आशेची पुंजी होती. तीच पुंजी घेऊन इजिप्त पुढे चालत राहिला.

1990 मध्ये ते पुन्हा वर्ल्ड कपमध्ये परतले. नेदरलँड्सशी बरोबरी, आयर्लंडशी बरोबरी; पण इंग्लंडकडून पराभव आणि प्रवास संपला. 2018 मध्ये पुन्हा आशा जागली. मोहम्मद सलाह होता. संपूर्ण देशाची स्वप्नं त्याच्या खांद्यावर होती. पण रशिया, उरुग्वे आणि सौदी अरेबियाने ती स्वप्नं मोडली. सलाह दुखापतग्रस्त खांद्याने खेळला; पण नशिबाच्या खांद्यावर कोणाचा हात नव्हता. आणि मग आला तो दिवस. स्कोअरबोर्डवर विजयाची नोंद झाली तेव्हा तो फक्त एका सामन्याचा निकाल नव्हता. तो 92 वर्षांच्या प्रतीक्षेचा स्फोट होता. पिरॅमिडच्या दगडांमध्ये साठलेला आनंद जणू बाहेर पडला. नाईल नदीचं पाणीही त्या दिवशी थोडं अधिक अभिमानाने वाहत असावं.

हा विजय फक्त सलाहचा नाही. हा त्या निनावी मुलाचा आहे, ज्याने फाटलेल्या बुटांनी वाळूत सराव केला. हा त्या आईचा आहे, जिने मुलासाठी नवीन बूट घेण्यासाठी स्वतःची हौस बाजूला ठेवली. हा त्या वडिलांचा आहे, ज्यांनी मुलाला सांगितलं, फुटबॉल खेळ, पण स्वप्नंही खेळ. हा त्या देशाचा आहे, ज्याने युद्धाच्या तोफांचा आवाज ऐकत असतानाही कान रेडिओला लावून सामना ऐकला.

आजच्या पिढीला हा विजय कदाचित एक आकडा वाटेल, पण त्या आकडय़ामागे नऊ दशकांचे अश्रू आहेत. अपयश आहेत. संघर्ष आहेत. अपमान आहेत. आणि तरीही हार न मानण्याची जिद्द आहे. म्हणूनच हा विजय इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरला जाईल. कारण काही गोल जाळं फाडतात. काही विक्रम मोडतात. पण काही गोल संपूर्ण राष्ट्राच्या छातीत नऊ दशकांपासून साचलेला हुंदका फोडतात. काल इजिप्तचा तसाच एक गोल झाला आणि काल, 92 वर्षांनी, एका राष्ट्राची छाती अखेर मोकळी झाली.

Comments are closed.