युरोपमध्ये सूर्य आग ओकतोय; 1947 चा विक्रम मोडला, भीषण उष्माघातामुळे फ्रान्समध्ये 18 जणांचा मृत्यू
युरोप खंडामध्ये सध्या सूर्य आग ओकत आहे. भीषण उष्माघातामुळे फ्रान्समध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून, आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मृतांमध्ये आग्नेय फ्रान्समधील दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही लहान मुलं घराबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तसेच बोर्दू भागात उष्णतेच्या लाटेमुळे तीन वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी फ्रान्स आणि स्पेनमधील अनेक शहरांमध्ये ऐतिहासिक तापमानाची नोंद झाली. फ्रान्सच्या बोर्दू शहरात 41.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पोइटियर्स शहरात 41.2 अंश सेल्सिअस तापमान होते. यामुळे 1947 सालचा विक्रम मोडला. दुसरीकडे, सौम्य हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या स्पेनच्या सॅन सेबॅस्टियन शहरात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे.
उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांनी नदी, तलाव आणि समुद्राचा आसरा घेतला आहे. मात्र, यामुळे पाण्यात बुडून मरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रविवारी आणि सोमवारी दरम्यान तब्बल 13 जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रशासनाने नागरिकांना केवळ देखरेख असलेल्या सुरक्षित ठिकाणीच पोहण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे कारण?
हवामान तज्ज्ञांच्या मते, या उष्णतेच्या लाटेमागे ओमेगा ब्लॉक ही वातावरणीय स्थिती कारणीभूत आहे. यामुळे सहारा वाळवंटातून उष्ण हवा युरोपच्या दिशेने खेचली जात आहे. वर्ल्ड मीटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, युरोप खंड जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने तापत आहे. या लाटेचा फटका ब्रिटन, इटली आणि बेल्जियमलाही बसला असून इटलीतील 12 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments are closed.