महाराष्ट्राचं जलसंधारण खातं मोहित कंबोज चालवतो, माझ्याकडे पुरावे आहेत; अंबादास दानवे यांच्या दाव्याने भाजप आमदारांचा थयथयाट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषदेत जलसंधारण आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. “राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण खातं हे मोहित कंबोज चालवत असून, माझ्याकडे याचे ऑडिओ पुरावे आहेत,” असा खळबळजनक दावा दानवे यांनी केल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्नचिन्ह

राज्यातील पाणीटंचाई आणि सरकारच्या उपाययोजनांवर बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा १ आणि टप्पा २ यशस्वीपणे सुरू असल्याचा दावा सरकार करत आहे. मग असे असतानाही आजही राज्यातील तब्बल ७ ते ८ हजार गावांमध्ये पाण्याचे टँकर का सुरू आहेत? हा सगळा खटाटोप केवळ कंत्राटदारांची सोय करण्यासाठी आणि त्यांची घरे भरण्यासाठी सुरू आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘अधिकाऱ्यांना विचारल्यास ते मोहित कंबोजला फोन करायला सांगतात’

जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढताना दानवे यांनी थेट मोहित कंबोज यांचे नाव घेतले. या सरकारी खात्यांमध्ये बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप प्रचंड वाढला असल्याचा आरोप त्यांनी केला. “जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना एखाद्या कामाबद्दल विचारले असता, ते थेट मोहित कंबोज यांना फोन करण्यास सांगतात. मोहित कंबोज यांचा या खात्याशी आणि सरकारशी नेमका काय संबंध आहे?” असा थेट प्रश्न दानवे यांनी विचारला.

दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर दानवे अधिकच आक्रमक झाले. “मी हवेत आरोप करत नाही, माझ्याकडे एका अधिकाऱ्याने कंबोज यांचे नाव घेतल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग उपलब्ध असून, तो पुरावा मी सभागृहात देऊ शकतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.