रोहित शर्मासाठी दुहेरी आनंदाचा क्षण! राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान, जाणून घ्या आजची तारीख का आहे खास?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज २३ जून रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते रोहितला हा सन्मान देऊन रोहितला गौरविण्यात आलं. पद्मश्री पुरस्कार मिळतानाचा हा आजचा दिवस रोहित शर्मासाठी अधिक खास ठरला.
भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक विक्रम रचणारा फलंदाज म्हणून रोहित शर्माचं नाव क्रीडा जगतात आदराने घेतलं जातं. हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारताना रोहितसह त्याच्या कोट्यवधी चाहत्यांनाही तितकाच आनंद होत होता. रोहित शर्मा त्याचा साधा स्वभाव, मिनमिळावूपणा यामुळे चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. रोहितचा हा सन्मान केवळ त्याचा वैयक्तिक गौरव नसून, भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचा आणि कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचा सन्मान आहे.
रोहित शर्माला आज म्हणजेच २३ जून रोजी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. हिटमॅनसाठी हा जणू दुग्धशर्करा योग आहे. कारण आजच्या दिवशीच १९ वर्षांपूर्वी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्ण केलं होतं. रोहितेन २३ जून २००७ मध्ये आयर्लंडमधील बेलफास्ट वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि आजच्या दिवशी १९ वर्षांनंतर रोहित शर्माला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील योगदानासाठी भारताचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं जेतपद पटकावलं होतं. याशिवाय रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने २०२३ च्या वनडे विश्वचषकात संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. रोहित शर्माने टी-२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली असून तो वनडे क्रिकेटमध्ये अजूनही खेळत आहे. रोहितने १९ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ५११ सामने खेळले असून त्याच्या नावे एकूण १९,७०२ धावा आहेत. तर ५० शतकं त्याने झळकावली आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ६७ सामने खेळले असून १२ शतकांसह ४३०१ धावा केल्याआहेत. यामधील त्याची सर्वात मोठी धावसंख्या २१२ आहे. यानंतर वनडे क्रिकेटमध्ये २८५ सामने खेळले असून ३३ शतकांसह एकूण ११,७२० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रोहितची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या २६४ आहे, आजपर्यंत रोहितचा हा वनडेमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम कोणीही मोडलेला नाही. यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने १५९ सामने खेळले असून ५ शतकांच्या आधारे ४२३१ धावा केल्या आहेत. टी-२० मधील रोहितची सर्वात मोठी धावसंख्या १२१ धावा आहे.
Comments are closed.