ज्या दिवशी केलं होतं आंतरराष्ट्रीय पदार्पण, त्याच दिवशी हिटमॅनचा पद्मश्रीने गौरव! क्रिकेट जगतासाठी अभिमानाची बाब
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मंगळवार, 23 जून रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्याला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. रोहित शर्माला हा पुरस्कार याच वर्षी मे महिन्यात मिळणार होता, परंतु क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते राष्ट्रपती भवनात उपस्थित राहू शकले नव्हते.
रोहित शर्मासाठी हा दिवस अत्यंत खास आहे, कारण 23 जून 2007 रोजी त्याने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या ऐतिहासिक दिवसाच्या बरोबर 19 वर्षांनंतर, त्याच तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रोहित शर्मा काळ्या रंगाच्या सूटमध्ये सोहळ्यात सहभागी झाला होता आणि पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्याने राष्ट्रपतींना अभिवादन केले. 2026 मध्ये पद्मश्री मिळवणारा रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू नाही; यापूर्वी मे महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरलाही (Harmanpreet Kaur) पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
रोहित शर्माने आपल्या गौरवशाली कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. टीम इंडियासाठी खेळताना त्याने आतापर्यंत 510 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 19 वर्षांच्या प्रवासात त्यांनी 20,173 धावा केल्या असून, तिन्ही फॉरमॅट मिळून 50 शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 653 षटकार आहेत, जो जगातला सर्वाधिक विक्रम आहे.
रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तीन वेळा द्विशतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
Comments are closed.