मुंबईत महापौरांच्या डोळ्यांदेखत पालिकेचा अधिकारी मॅनहोलमध्ये पडला, नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत काढले बाहेर
मुंबई महानगरपालिकेने केलेली नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या दाव्यांची पोलखोल करणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील माटुंगा परिसरात पाहणी दौऱ्यादरम्यान महापौर रितू तावडे यांच्यासमोरच पालिकेचा अधिकारी थेट मॅनहोलमध्ये पडला. हा अधिकारी महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सोबत होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
माटुंगा परिसरात पाहणी दौऱ्यादरम्यान कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे या एका अधिकाऱ्यासोबत बातचीत करत पाहणी करत होत्या. याच दरम्यान रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आणि उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने हा अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. महापौरांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ एकच खळबळ उडाली होती. मात्र, तिथे उपस्थित असलेले आजूबाजूचे नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या कर्मचाऱ्याला आधार देत सुखरूप बाहेर काढले. माटुंग्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे असल्याचे चित्र समोर आले आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे खड्डे आणि मॅनहोल न दिसल्याने अधिकारी त्यात पडला.
महापौर रितू तावडे हे पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी करत असतानाच त्यांच्यासमोरच एक अधिकारी खड्ड्यात पडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/cOK88Wl78b
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 24 जून 2026
या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेने केलेले नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीचे सर्व दावे फोल ठरले असून मुंबईतील उघड्या मॅनहोलचे जीवघेणे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या अधिकृत पाहणी दौऱ्यातच जर अशी दुर्घटना घडत असेल तर, पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.