मुसळधार पावसाचा ट्रान्स हार्बर मार्गाला फटका, 24 लोकल रद्द, वाहतूक धीम्या गतीने सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तुर्भे आणि वाशी स्थानकांदरम्यान रुळाखालची माती वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असून गाड्या सध्या धीम्या गतीने धावत आहेत. ANI ने याबाबत वृत्त दिले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे आतापर्यंत 24 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रभावित भागातील दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव तुर्भे-वाशी स्थानकांदरम्यान लोकल गाड्या कमी वेगाने चालवण्यात येत आहेत.

मंगळवार संध्याकाळपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी पहाटे जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यात पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.