‘11 वपुर्झा’मधून वपुंच्या स्मृतींना उजाळा
मराठी साहित्यातील लोकप्रिय कथाकार, कादंबरीकार आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व.पु. काळे यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘11 वपुर्झा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सहजसुंदर शैलीतून मध्यमवर्गीय जीवन, मानवी नाती आणि भावविश्व शब्दबद्ध करणाऱया वपुंनी मराठी वाचकांना एक वेगळाच साहित्यिक ठेवा दिला. ‘पार्टनर’, ‘आपण सारे अर्जुन’, ‘वपुर्झा’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.
या कार्यक्रमात अभिनेते सुनील बर्वे, शशांक केतकर तसेच वपुंची कन्या स्वाती काळे-चांदोरकर वपुंच्या साहित्यिक आठवणींना उजाळा देणार आहेत. त्यांच्या लेखनातील काही खास गोष्टी एका विशेष संहितेनुसार रसिकांसमोर उलगडल्या जाणार आहेत.
शनिवार, 27 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम विनामूल्य सादर होणार आहे. वपुंच्या साहित्यावर प्रेम करणाऱया सर्व रसिकांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.