पडद्याआडून – ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’, आधुनिक कुटुंबव्यवस्थेचं वेदनादायी वास्तव
>> पराग खोत
सध्याच्या समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढत असताना त्याविषयीची चर्चा बहुधा पती-पत्नींच्या नात्यापुरतीच मर्यादित राहते. न्यायालयीन लढाया, आर्थिक तडजोडी, नव्या आयुष्याची सुरुवात यांवर भरपूर भाष्य होतं; घटस्फोट हवा की नको? त्याने समाजाची घडी विस्कटते की व्यक्तिस्वातंत्र्यासाठी तो आवश्यक आहे? यावर उलटसुलट प्रतिक्रिया येतात. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सर्वाधिक होरपळून निघणाऱया मुलांच्या भावविश्वाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंबहुना या सर्वात त्यांना गृहीतच धरलं जातं. डॉ. नरेश नाईक लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे नाटक याच दुर्लक्षित वास्तवाला भिडतं आणि प्रेक्षकाला अंतर्मुख करून जातं. सुरुवातीला ‘दॅट्स द स्पिरिट’ या नावाने रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने आशयाशी अधिक सुसंगत शीर्षक स्वीकारत ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे नाव धारण केले आहे. खरं तर हे केवळ एका स्त्रीच्या घटस्फोटाची गोष्ट नाही; तर आईवडिलांच्या झालेल्या घटस्फोटानंतर, तुटलेल्या नात्यांच्या राखेत स्वतःचं अस्तित्व शोधणाऱया एका मुलाची वेदनादायी कहाणी आहे.
नाटकाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे सुशीला. घटस्फोटानंतर आयुष्याची नव्याने उभारणी करण्यासाठी तिने मनोहरशी पुनर्विवाह केला आहे. मनोहरचा मुलगा श्रीधर आणि सुशीलाची मुलगी कांचन या नव्या नात्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नाजूक वयात असलेली त्यांची दोन्ही मुलं या विवाहामुळे थोडी अवघडून गेली असली तरी एक कुटुंब म्हणून ती एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी पंधरा वर्षांपूर्वी आईपासून दुरावलेला सुशीलाचा मुलगा विनय अचानक तिच्या आयुष्यात परत येतो आणि येताना तो स्वतःबरोबर अनेक वादळं घेऊन येतो. आईला स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा तो हट्ट धरतो आणि इथून पुढे सुरू होतो भावनिक संघर्षाचा एक अस्वस्थ करणारा प्रवास. मनोहर आणि सुशीलाच्या नुकत्याच सुरू झालेल्या नव्या संसाराची घडी विस्कटते की काय? अशी परिस्थिती निर्माण होते आणि पुढे…
नाटकाची खरी ताकद त्याच्या विषयात आहे. घटस्फोटानंतर मुलांच्या मनात निर्माण होणारी पोकळी, असुरक्षितता, मालकीभाव, राग आणि प्रेमाची आस यांचं अत्यंत संवेदनशील चित्रण लेखकाने केलं आहे. न्यायालयीन निर्णय मुलांच्या राहण्याची व्यवस्था करू शकतात; पण त्यांच्या मनातील जखमांवर फुंकर घालू शकत नाहीत, हे सत्य, हे नाटक ठळकपणे अधोरेखित करतं. मात्र नाटकाची हीच जमेची बाजू काही प्रमाणात त्याची मर्यादाही ठरते. विनयच्या हट्टाभोवती उभा राहिलेला संघर्ष इतका गुंतागुंतीचा आहे की एका टप्प्यानंतर कथानक एका भावनिक कोंडीत अडकल्यासारखं वाटू लागतं. पात्रे वेगवेगळे पर्याय मांडतात, समजुतीचे मार्ग शोधतात; पण प्रश्नाचा गुंता सुटत नाही. अर्थात ही लेखकाची जाणीवपूर्वक निवड असावी, कारण वास्तवातही अशा प्रश्नांची सरळ उत्तरं नसतात. त्यामुळे नाटक काही वेळा पुनरुक्तीच्या वाटेवर गेलं तरी त्यामागचा आशय प्रेक्षकाला धरून ठेवतो. मात्र काही वेळा पात्रांचे हतबल होणे अनाकलनीय वाटते. अर्थात ती नाटकाची गरज असू शकते.
क्लायमॅक्सला सगळा गुंता तर्कशुद्ध पद्धतीने सोडवला असला तरी अधेमधे तर्काला फाटा दिल्यासारखा वाटतो आणि त्यामुळे कधीकधी हे नाटक आक्रस्ताळी होतं. राजन ताम्हाणे यांचं दिग्दर्शन संयमी आणि आशयाला पूरक आहे. त्यांनी पात्रांच्या भावनिक संघर्षाला कृत्रिम नाटय़मयतेचा मुलामा न देता स्वाभाविकतेने रंगमंचावर उभं केलं आहे. विशेषतः संवादांमधून निर्माण होणारा ताण आणि पात्रांमधील असहायता त्यांनी प्रभावीपणे टिपली आहे. अभिनयाच्या आघाडीवर अदिती देशपांडे यांची सुशीला विशेष लक्षात राहते. आई, पत्नी आणि स्त्राr या तिन्ही स्तरांवर होणारी तिची भावनिक घुसमट त्यांनी अत्यंत परिणामकारकपणे साकारली आहे. संग्राम समेळ यांचा विनय हा नाटकाचा आत्मा आहे. तो ह्या कथेतील अँटी हिरो आहे. त्याच्या आक्रमकतेमागची वेदना, हट्टामागचं प्रेम आणि युक्तिवादामागची पोकळी त्याने ताकदीने उभी केली आहे. एक्सप्रेशन्स आणि संवादफेक या दोन आघाडय़ांवर तो बाजी मारून जातो. राजन ताम्हाणे यांचा मनोहर समंजस, संयमी आणि वास्तववादी वाटतो. अपर्णा चोथे यांनी समुपदेशकाच्या भूमिकेत संतुलित अभिनय केला आहे. मात्र त्यांच्या भूमिकेला लेखनातच पाठबळ मिळालेलं नाही. प्रसाद बेर्डे, वरदा देवधर आणि अनिकेत गाडे यांनीही आपापल्या भूमिका चोखपणे निभावल्या आहेत. संदेश बेंद्रे यांचे वास्तवदर्शी नेपथ्य, परीक्षित भातखंडे यांचे प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत, तसेच प्रकाशयोजना आणि वेशभूषा नाटकाच्या वातावरणनिर्मितीत मोलाची भर घालतात.
‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे केवळ मनोरंजनासाठी रंगमंचावर आलेलं नाटक नाही. ते आधुनिक कुटुंबव्यवस्थेतील एका वेदनादायी वास्तवाशी प्रामाणिकपणे संवाद साधतं. घटस्फोटाचा निर्णय दोन व्यक्ती घेत असल्या, तरी त्याची किंमत अनेकदा मुलांना चुकवावी लागते, याची अस्वस्थ करणारी जाणीव हे नाटक करून देतं. प्रश्नांची तयार उत्तरं न देता विचार करायला भाग पाडणारी ही नाटय़कृती म्हणून निश्चितच उल्लेखनीय ठरते. वास्तवाचा तो दाह अनुभवायचा असेल तर हे नाटक पाहायलाच हवं.
- लेखक – डॉ. नरेश नाईक
- दिग्दर्शक – राजन ताम्हाणे
- कलाकार – अदिती देशपांडे, राजन ताम्हाणे, अपर्णा चोथे, वरदा देवधर, प्रसाद बेर्डे, अनिकेत गाडे आणि संग्राम समेळ.
- संगीत – परीक्षित भातखंडे
- नेपथ्य – संदेश बेंद्रे
- प्रकाशयोजना – राजन ताम्हाणे
- वेशभूषा – मंगल केंकरे
- निर्माता – रंगनील
- सूत्रधार – गोट्या सावंत
- छायाचित्र सौजन्य – संजय पेठे
Comments are closed.