Share Market News – शेअर बाजारात तेजीचे संकेत? सेन्सेक्स, निफ्टी वधारले, ऑटो सेक्टरमध्ये तेजी
जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारावर दबाव दिसत आहे. दोन दिवसांपुर्वी अमेरिका आणि आशियाई बाजारात AI शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही दिसला होता. त्यादिवशी बाजारात मोठी घसरण झाली होती. मात्र, गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळेही बाजाराला चांगला आधार मिळाला आहे.
शेअर बाजारात गुरुवारी चांगली तेजी दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० दोन्ही तेजीने उघडले आणि तेजीत व्यवहार करत आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आणि आशियाई बाजारांमधून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे या तेजीला बळ मिळाले आहे.
बाजारात व्यावहाराला सुरुवात होताच निफ्टीने सुरुवातीच्या सत्रात २४,१०० चा टप्पा ओलांडला आणि सेन्सेक्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. ऑटो, बँकिंग आणि आयटी स्टॉक्समध्येही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. ऑटो आणि रिअल्टी स्टॉक्सच्या तोजीमुळे निफ्टी ५० आणि सेन्सेक्सने आपली तेजी कायम ठेवली. दुपारी 12 वाजेपर्यंत निफ्टी २१७.९५ अंकांनी म्हणजेच ०.९१ टक्क्यांनी वाढून २४,२३९.६० वर व्यवहार करत होता आणि सेन्सेक्स ७१७.५९ अंकांनी म्हणजेच०.९३ टक्क्यांनी वाढून ७७,७०८.८१ वर होता. मात्र, 1 वाजण्याच्या सुमारास दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे.
निफ्टी ५० निर्देशांकात इंटरग्लोब एव्हिएशन, श्रीराम फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे सर्वाधिक वाढ झालेले शेअर्स होते. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे ०.३९ टक्के आणि ०.२५ टक्क्यांनी वधारले होते. निफ्टी ऑटो आणि निफ्टी रिअल्टीने चांगली कामगिरी केली, तर निफ्टी मेटल आणि मीडियाची कामगिरी खराब होती. सध्याची बाजाराची स्थिती बघता गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments are closed.