भारत-आयर्लंड शेवटच्या टी-20 सामन्याचा इतिहास काय सांगतो? अवघ्या 96 धावांवर ऑल आऊट झालता ‘हा’ संघ!

भारतीय सीनियर क्रिकेट टीम सध्या यूकेच्या (UK) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आधी आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer captain of T20 cricket team of india) भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली असून, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) जागी आता तो कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील शेवटचा टी-20 सामना 5 जून 2024 रोजी टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. त्या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, त्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील खेळले होते. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत आयर्लंडला 100 धावांचा टप्पाही गाठू दिला नव्हता. आयर्लंडचा संपूर्ण संघ 16 षटकांत 96 धावांत गारद झाला होता. त्या सामन्यात हार्दिक पांड्याने 3, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या.

97 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 12.2 षटकांत सहज पूर्ण केले. त्या सामन्यात विराट कोहली विशेष काही करू शकला नाही आणि 5 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत 37 चेंडूत 54 धावा केल्या होत्या (तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला होता). ऋषभ पंतने 26 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्यामुळे टीम इंडियाने तो सामना सहज जिंकला होता.

2024 नंतर आता पहिल्यांदाच टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. रोहित आणि विराट यांनी आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने ते या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. या मालिकेतील सर्वांचे लक्ष 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर (vaibhav suryavanshi) असणार आहे. वैभवला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले असून, त्याला पहिल्या टी-20 मध्ये पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments are closed.