FIFA World Cup 2026 – मैदानावर उतरताच नेमारला अश्रू अनावर! 3 वर्षांच्या वनवासानंतर ब्राझीलच्या जर्सीत पुनरागमन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फुटबॉलच्या मैदानावर अनेक विजय, पराभव आणि विक्रम पाहायला मिळतात. मात्र काही क्षण असे असतात की ते थेट चाहत्यांच्या हृदयाला भिडतात. फिफा विश्वचषकात स्कॉटलंडवर ब्राझीलने 3-0 अशी दणदणीत मात केली, पण या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती ब्राझीलचा सुपरस्टार नेमारच्या भावनिक पुनरागमनाची. तब्बल तीन वर्षांनंतर राष्ट्रीय संघाच्या जर्सीत मैदानात उतरताच नेमारच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्याच्या संघर्षमय प्रवासाची जणू कहाणीच जगासमोर उलगडली.

हार्ड रॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या 76 व्या मिनिटाला ब्राझीलचे प्रशिक्षक कार्लो अंकेलोट्टी यांनी 34 वर्षीय नेमारला मैदानात उतरवले. मॅथ्यूज चुन्हा याच्या जागी संधी मिळताच संपूर्ण स्टेडियम टाळ्या आणि घोषणांनी दणाणून गेले. चाहत्यांचे प्रेम पाहून नेमारला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. कॅमेऱयांनी त्याला डोळे पुसताना टिपले आणि हा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

सामन्यानंतर नेमार त्याची जोडीदार ब्रुना बियानकार्डी आणि दोन्ही मुलींसोबत दिसला. ब्रुनाने नेमारला मिठी मारत चुंबन दिले, तर नेमार मुली मावी आणि मेलसोबत खेळताना दिसला. या भावनिक क्षणाने ब्राझीलच्या चाहत्यांनाही भारावून टाकले.

ऑक्टोबर 2023 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात

ऑक्टोबर 2023 नंतर नेमार प्रथमच ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी खेळला. गेल्या तीन वर्षांत दुखापतींनी त्याच्या कारकीर्दीला अक्षरशः ग्रहण लावले होते. अनेकदा त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सततच्या फिटनेस समस्यांमुळे तो दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिला.

शस्त्रक्रिया, वेदना आणि पुनर्वसनाचा कठीण प्रवास

गेल्या काही वर्षांत नेमारला गुडघ्याच्या गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले. त्यासाठी त्याच्यावर एकापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतरचा प्रदीर्घ पुनर्वसनाचा काळही त्याच्यासाठी मोठी परीक्षा ठरला. या काळात त्याच्या भविष्याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र प्रशिक्षक एन्सेलोटी यांनी नेमारवरील विश्वास कायम ठेवला. गोल करण्यात तो यशस्वी झाला नसला तरी त्याचे पुनरागमनच ब्राझीलसाठी मोठया विजयासारखे ठरले.

Comments are closed.