‘बालभारती’साठी कसाऱ्यातील चित्रकाराने रेखाटली दोनशे चित्रे, कला शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचा गौरव
कोणत्याही चित्रकाराला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले तर त्याचा तो गौरवच असतो. कसाऱ्याच्या गोटे वा. ह. अग्रवाल हायस्कूलमधील कला शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी पाठ्यपुस्तकांसाठी तब्बल दोनशे चित्रे रेखाटली आहेत. ‘बालभारती’ने त्यांची निवड केली असून सूर्यवंशी यांनी पाठ्यपुस्तकांसाठी विविध प्रकारची लक्षवेधी चित्रे काढली आहेत. इंग्रजी पुस्तकाच्या नव्या अभ्यासक्रमात या चित्रांचा समावेश करण्यात आला असून एकूण 2 कोटी पाठ्यपुस्तके छापण्यात आली आहेत.
पाठ्यपुस्तकातील धडे व कविता वाचताना विद्यार्थ्यांना त्याची ओळख अधिक चांगल्या रीतीने व्हावी यासाठी संबंधित विषयाच्या अनुषंगाने चित्रे रेखाटली जातात. धडे व कवितांची निवड करण्याबरोबरच त्या विषयाशी संबंधित चित्रे काढण्याचे कामदेखील आव्हानात्मक असते. हे आव्हान कसाऱ्यातील कला शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी स्वीकारले. एवढेच नव्हे तर पाठ्यपुस्तकातील विषय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी समर्पक अशी रेखीव चित्रेदेखील काढली आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण
सुनील सूर्यवंशी यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कला विषयात पदवी संपादन केली असून ते 2008 पासून अग्रवाल हायस्कूलमध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर कलादिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट व नाटकांमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अनेक मालिकांचे स्टोरी बोर्ड तयार करण्याचेही उल्लेखनीय काम त्यांनी केले. कसारा विभागातील अनेक गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य चित्रकला शिकवली आहे.
Comments are closed.