फ्रीजचे तापमान : पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान किती असावे?

पावसाळा सुरू झाला की आपण छत्री, रेनकोट आणि आरोग्याची काळजी घेतो. पण घरातील फ्रिजच्या तापमानाकडे मात्र अनेकांचं दुर्लक्ष होतं. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी फ्रिज योग्य तापमानावर ठेवणं ही केवळ सवय नसून कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेली महत्त्वाची बाब ठरते. छोटासा बदल तुमचं अन्न अधिक काळ ताजं ठेवू शकतो आणि फ्रिजची कार्यक्षमताही टिकवून ठेवू शकतो.

फ्रिजचं तापमान बदलणं का गरजेचं?
उन्हाळ्यानंतर अचानक हवामानात बदल होतो आणि पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो. या बदलाचा परिणाम फ्रिजच्या कार्यक्षमतेवरही होतो. जर तापमान योग्य नसेल, तर फ्रिजमध्ये ठेवलेले दूध, भाज्या, फळं आणि शिजवलेले पदार्थ अपेक्षेपेक्षा लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे ऋतूनुसार फ्रिजची सेटिंग बदलणं आवश्यक आहे.

फ्रिजचं आदर्श तापमान किती असावं?
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचं तापमान साधारण 2°C ते 3°C दरम्यान ठेवणं अधिक योग्य ठरतं. यामुळे अन्नपदार्थ सुरक्षित राहतात आणि त्यांचा ताजेपणा जास्त काळ टिकतो. ज्या फ्रिजमध्ये फ्रीजरचं स्वतंत्र तापमान सेट करण्याची सुविधा आहे, त्यामध्ये फ्रीजरचं तापमान सुमारे -19°C आणि रेफ्रिजरेटरचं तापमान 3°C ठेवणं फायदेशीर मानलं जातं.

जुन्या फ्रिजमध्ये कोणती सेटिंग वापरावी?
अनेक घरांमध्ये अजूनही नंबर किंवा लो, मिडियम आणि हाय अशा सेटिंग असलेले फ्रिज वापरले जातात. अशा फ्रिजमध्ये पावसाळ्यात मिडियम किंवा 3 ते 4 या सेटिंगवर तापमान ठेवणं योग्य ठरतं. यामुळे फ्रिजवर अतिरिक्त ताण येत नाही आणि अन्नही सुरक्षित राहतं.

अन्न ताजं ठेवण्यासाठी या सवयी लावा
फ्रिजमध्ये गरम अन्न लगेच ठेवू नका. अन्न थंड झाल्यानंतरच ते बंद डब्यात ठेवावं. फळं आणि भाज्या वेगवेगळ्या विभागात ठेवाव्यात. फ्रिजचं दार वारंवार उघडणं टाळावं, कारण त्यामुळे आतलं तापमान सतत बदलत राहतं. नियमित साफसफाई केल्यास दुर्गंधी कमी होते आणि जंतू वाढण्याचाही धोका कमी होतो.

Comments are closed.