गद्दार खासदाराच्या कंपनीने अख्ख्या धाराशिवमध्ये ५०० कोटींचे प्लॉट खरेदी केले, ईडीच्या भीतीने तो शिंदे गटात गेला – संजय राऊत

गद्दार खासदाराच्या कंपनीने अख्ख्या धाराशिवमध्ये ५०० कोटींचे प्लॉट खरेदी केले. ईडीच्या भीतीने तो शिंदे गटात गेला, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दार खासदाराच्या समाचार घेतला. धाराशिव येथील सभेत बोलताना ते असे म्हणाले आहेत.

भाषणाची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले की, “येताना जे चित्र मी पाहिलं, तेव्हा रस्त्यात मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की, धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरू झालेलं आहे आणि हे ऑपरेशन तुडवा धाराशिवमध्ये यशस्वी होणार आहे. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे की, ते शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी असंही सांगितलं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत ते उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाहीत. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. असा निष्ठावंत आमदार शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना मिळालेला आहे.”

धाराशिवमधील गद्दार खासदाराबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हा जो गद्दार आहे, याला मी सोंगाड्या म्हणतो. याने एवढी सोंगं घेतली, एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये तो काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐका तुम्ही. तो म्हणायचा, मी २००६ साली ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा नव्हतो. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत उद्धव साहेबांनी माझा हात पकडला. मला साथ दिली. मला एक वेळा आमदार केलं, दोन वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही. मग आता काय केलंस गद्दारा? अरे भामट्या, आता काय केलेलं आहेस?”

ते म्हणाले, “हा तुमचा खासदार १०० कोटींना विकला गेला. उमरग्याच्या १०० शिवसैनिकांनी पत्रक काढलंय आणि त्यात त्यांनी सांगितलंय की, आम्ही आमच्या १०० जणांच्या किडन्या विकतो आणि तुला पैसे देतो, पण तू शिवसेना सोडू नकोस. ही निष्ठा आहे. किडन्या विकून त्याला पैसे द्यायला लोक तयार झालेले आहेत, तरी हा माणूस गेला. सर्व काही मिळालं. आमदार केलं, खासदार केलं. ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. तू जो खासदार झालास, तो काय तुझ्या स्वतःच्या ताकतीवर आणि हिमतीवर झाला नाहीस. या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला आणि हा त्यागसुद्धा साधा नाही. अनेक शिवसैनिकांनी आपले प्राण पणाला लावून याला खासदार करण्यासाठी बलिदान दिलेलं आहे.”

संजय राऊत म्हणाले, “७ मे २०२४ ला भूम तालुक्यातल्या पाठसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटील याची हत्या झाली. मतदान केंद्राच्या बाहेर ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेंच्या लोकांनी केली, शिंदे गटाच्या गुंडाने केली. आणि आज हा खासदार त्या मारेकऱ्यांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला आहे. लाज वाटली पाहिजे. त्याने स्वतःला किंवा त्याच्या आत्म्याला कधी विचारलं का की, ‘तू माझ्यासाठी प्राणांचं बलिदान दिलंस, तुझी हत्या झाली, मग आता मी पक्ष सोडू का?’ त्याच्या आत्म्याला त्याने विचारलं नाही आणि तो मारेकऱ्यांच्या गोट्यात सामील झाला. असा हा भामटा, असा हा सोंगाड्या… याला आता धाराशिवच्या रस्त्यांवर फिरू देऊ नका.”

राऊत म्हणाले, “शिवसैनिकांनो, हा पक्ष सोडून का गेला, याची अनेक कारणं दिली जातात. तो म्हणतो की, मी विकासासाठी गेलो. कोणाचा विकास? काय विकास केला? दोन वेळा खासदार, एक वेळा आमदार होता. काय केलं? या धाराशिवची दुबई केली का, सिंगापूर केलं, कॅनडा केलं, काय केलं? काहीही केलेलं नाहीये. तो का गेला, आता ऐका! तो गेला कारण त्याने त्याच्या बँकांमध्ये, त्याच्या पतसंस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने भ्रष्टाचार केला. आणि आता तर मला असंही वाटतंय की, त्याच्या वडिलांचा जो खून झाला, त्या खुनामागेसुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “हा का गेला? कारण पवनराजे मल्टीस्टेट ही जी त्याची कंपनी आहे, त्या कंपनीने ५०० कोटींचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. त्याची ईडीची चौकशी लागली. ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे. आपल्या वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या या मल्टीस्टेटमध्ये गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून, कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार त्याने केला. तेरणातलं भंगार विकून पैसा खाल्ला. असे अनेक गुन्हे त्याने केले. म्हणून या सगळ्याची चौकशी लागली आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरपोक आणि सोंगाड्या पक्ष सोडून गेला. मला असं वाटतं की, आम्ही १५-२० वर्षं एका सापाला दूध पाजलं. आता त्या सापाचा फणा ठेचण्याची वेळ आलेली आहे आणि हे शिवसैनिक त्याचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. इथून पुन्हा एकदा शिवसेनेचा, शिवसेनेच्या विचारांचा कडवट शिवसैनिक खासदार म्हणून दिल्लीला पाठवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही.”

Comments are closed.