मेस्सीसोबत फोटो काढणारे भाजपचे नेते फुटबॉलचे मैदान हिरावून घेत आहेत; वांद्रे मैदानाप्रकरणी आदित्य ठाकरे यांची टीका

वांद्रे येथील नेव्हिल डी’सूझा फुटबॉल अरेना वाचवण्यासाठी मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुक आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने कोणतेही ठोस कारण न देता हे फुटबॉल मैदानाचे रुपांतर प्रदर्शन केंद्रात रूपांतरित करण्याचा निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील तरुणांकडून खेळाची मैदाने आणि क्रीडा संघटनांची जागा हिरावून घेतली जात आहे. त्यामुळे हिंदुस्थानला फुटबॉलसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये यश मिळत नसल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भारतीयांना रात्रभर जागून इतर देशांचे सामने पाहावे लागतात, पण स्वतःचा संघ विश्वचषकात खेळेल, असे स्वप्न पाहण्याची संधीच सरकार हिरावून घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

खेळाडूंना आवश्यक असलेली क्रीडा पायाभूत सुविधा सरकारच बंद करत आहे. जवळपास 40 वर्षांपूर्वी भाजपचे अधिवेशन या मैदानावर आणि परिसरात झाले होते. त्यामुळे आता त्याच ठिकाणी भाजपच्या एका नेत्याच्या नावाने प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. “जर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या आवडत्या मैदानांवर प्रदर्शन केंद्र उभारण्यास सुरुवात केली, तर देशातील खेळाच्या मैदानांचे काय होईल?” असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

फुटबॉल आणि इतर खेळांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी तसेच सर्व स्तरांवरील खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि ही भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. “एका बाजूला भाजपचे नेते क्रिकेट स्टेडियममध्ये जाऊन लिओनेल मेस्सीच्या संघासोबत छायाचित्रे काढण्याची संधी शोधतात, तर दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाकडून फुटबॉलचे मैदान हिरावून घेतले जात आहे. या मैदानाच्या आजूबाजूला मोकळे भूखंड उपलब्ध असतानाही मुद्दाम हेच मैदान बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण येथे मोठ्या संख्येने तरुण फुटबॉल खेळतात,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.