दोन वर्षांपूर्वी नापास झाल्याचा राग, अर्धा तास वाद अन् शाळकरी विद्यार्थ्याकडून शिक्षकावर हल्ला

छत्रपती संभाजीनगर शाळेवर हल्ला शाळा… जिथे विद्यार्थी घडतात, संस्कार रुजतात आणि शिक्षक आयुष्य घडवतात. पण छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत घडलेली घटना या विश्वासालाच हादरा देणारी ठरली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने हल्ला केला. दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा राग, अर्धा तास चाललेला वाद आणि त्यानंतर रक्तरंजित शेवट. नेमकं काय घडलं?

Vishal Dhushing Attacked : मुख्याध्यापिकांच्या दालनात अर्धा तास वाद

टीसी घेण्यासाठी आलेला एक अल्पवयीन विद्यार्थी थेट मुख्याध्यापिकांच्या दालनात पोहोचला. तिथे त्याची भेट झाली त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्याशी. सुरुवातीला चर्चा सुरू झाली, मात्र काही क्षणांतच त्याचं रूपांतर वादात झालं. मुख्याध्यापिका आणि शिक्षक विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. विद्यार्थ्याच्या मनात दोन वर्षांपासून साचलेला राग आज उफाळून आला होता.

Online Knife Ordered : दोन वर्षांपूर्वीच्या अपयशाचा सूड, ऑनलाइन मागवला चाकू

2023 मध्ये नववीत शिकत असताना विशाल धूशिंग हे त्या विद्यार्थ्याचे वर्गशिक्षक होते. त्याच वर्षी तो परीक्षेत नापास झाला. त्या काळात शिक्षकांसोबत त्याचे वादही झाले होते. याच रागातून आज तो टीसी घेण्यासाठी येताना ऑनलाइन मागवलेला चाकू सोबत घेऊन आल्याचं तपासात समोर आलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime Case : अचानक वार करत केला रक्तपात

वाद संपताच वर्गशिक्षक दालनाबाहेर पडत असताना विद्यार्थ्याने अचानक चाकू बाहेर काढत त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षकांना वाचवण्यासाठी धावलेल्या एका व्यक्तीलाही त्याने चाकूचा धाक दाखवत मागे हटवलं. या गोंधळात मुख्याध्यापिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.

Student Attacked Teacher : शिक्षक रुग्णालयात, विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मात्र या एका घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात वाढत जाणारा राग वेळेवर ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत का? ऑनलाइन सहज उपलब्ध होणारी घातक हत्यारं अल्पवयीनांच्या हातात कशी पोहोचत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं… शिक्षकच सुरक्षित नसतील, तर शिक्षण व्यवस्थेसमोर उभं राहिलेलं हे संकट किती गंभीर आहे, याचाच विचार आता समाजाला करावा लागणार आहे.

ही बातमी वाचा :

Comments are closed.