पुरुषांना साध्या पाठदुखीपासून सुरू होतो हा आजार





महिलांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यासारख्या हाडांशी सबंधित असलेल्या समस्या सामान्य समजल्या जातात. कारण शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास महिलांना हा त्रास सुरू होतो. त्यातच महिलांमध्ये हार्मेान्स बदल, बाळंतपण, मेनॉपॉज यामुळेही हाडांची दुखणी, झिज सुरू होतात. पण ज्यावेळी पुरुषांना पाठदुखीसारख्या समस्या सुरू होतात तेव्हा मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. बैठ्या कामामुळे पाठ दुखत असावी असे त्यांना वाटते पण प्रत्येकवेळी पाठदुखीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण पुरुषांमध्ये अशाप्रकारची दुखणी ही हाड कमकुवत करणाऱ्या ऑस्टियोपोरोसिसची सुरुवात असू शकते. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

वाढत्या वयात महिलांप्रमाणेच पुरुषांच्याही हाडाची झिज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो. तसेच महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही वयाच्या ४० नंतर हार्मोन्स बदल होतात. यात टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी होते. ज्याचा परिणाम हाडांच्या घनतेवर होतो. हाड ठिसूळ होऊ लागतात. पण ही दुखणी हाडांपर्यंतच मर्यादीत राहत नाहीत तर स्नायूंवरही त्यांचा परिणाम होतो. अशावेळी कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारखी दुखणी तर मागे लागतातच शिवाय चालताना तोल जाऊन पडण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळेच वाढत्या वयात माणस तोल जाऊन पडल्याने हात, पाय , कंबर, पाठ, फ्रॅक्चर होतात. यालाच ऑस्टियोपोरोसिस , सायलेंट डिसिज असे म्हणतात. यात सुरुवातीला सामान्य पाठदुखी हळूहळू तीव्र होते. थकवा, सहनशक्ती कमी होणे अशी याची लक्षणे पुरुषांमध्ये दिसतात.

पण वेळीच तज्त्रांचा सल्ला घेतल्यास ऑस्टियोपोरोसिसवर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी आहारात कॅल्शियम,व्हिटामीन डी घ्यावे. त्याचबरोबर नियमित सकस आहार, चालणे फिरणे हवे. सिगारेट पिणे टाळावे. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे हाच यावर उपाय आहे.



Comments are closed.