रंगभूमीचे चालतेबोलते विद्यापीठ!
विजया मेहता ऊर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटपं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱया रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊनदेखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली. दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावरदेखील हिंदी चित्रपटांकडे वळल्या नाहीत. नाटय़क्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारून वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटके एकांकिका ‘रंगायन’ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱयांचा अत्यंत मोलाचा वाटा होता.
पुरस्कार
भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘कालिदास सन्मान’, ‘तन्वीर सन्मान’, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक’, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार’, ‘नाटय़दर्पण पुरस्कार’, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘रावसाहेब’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टरेट, इचलकरंजी मराठी नाटय़ संमेलनाध्यक्ष पद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत. विजया मेहता यांनी 'n.सी.पी.ए'च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली.
'रंगविणे'ने झपाटून टाकले
‘रंगायन’ संस्था व त्याअनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग बांधून प्रायोगिक एकांकिका नाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहा-बारा वर्षे जोमाने चालवली. सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे ‘रंगायन’ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली. मग विजयाबाई व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. ‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे’ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’चे रूपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा’, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स’ या एकांकिकेचे अनुवादित रूप ‘खुर्च्या’ या व अशा इतर काही विदेशी नाटय़कृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृतीसुद्धा पाश्चात्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत’ असा विचार करून जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘मुद्राराक्षस’, ‘शापुंतल’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’ या नाटकांचे प्रयोग मूळ वा रूपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले. ‘श्रीमंत’, ‘मादी’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘पुरुष’, ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘हयवदन’, ‘सावित्री’ अशी अनेक लक्षणीय नाटके, एकांकिका तसेच ‘पेस्तनजी’, ‘रावसाहेब’, ‘स्मृतिचित्रे’ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या, फुलवल्या. यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्टय़पूर्ण कलात्म ठसा उमटवला.
दिग्गज कलाकारांना घडवले
विजया बाईंनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं. मराठी नाटय़क्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली.
‘संध्याछाया’मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर’मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या काsंड माऱयाने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी’मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱहास असहाय्यपणे पाहणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी’मधील पती निधनानंतर कोसळणारी नाती व वाडय़ाचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिला.
'झिम्मा- आठवणींचा गोफ' हे विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात 1951 सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
भारतीय रंगभूमीचे तेजस्वी पर्व हरपले!
प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रात विजयाबाईंचे खूप मोठे काम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा भारतीय रंगभूमीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. सगळय़ात मोठय़ा नाटय़संस्था असलेल्या रंगायनच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक होत्या. साहित्य संघात त्यांनी काम केले. कलावैभव असो किंवा नाटय़मंदार असो अशा अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. पूर्णतः नवीन विचारांची रंगभूमी प्रस्थापित होत होती त्यात त्यांचे खूप मोलाचे योगदान होते. अनेक नाटय़संस्था, नाटककार, दिग्दर्शक, नट आणि नटय़ा अशी मोठी परंपरा त्यांनी रंगभूमीवर निर्माण केलेली आहे. त्यांनी रंगभूमीला दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. भारतीय रंगभूमीवरचे दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्या योगदानाचा जेव्हा उल्लेख होईल त्यात विजया मेहता यांचे नाव खूप वरच्या स्थानावर असणार आहे.
चंद्रकांत कुलकर्णी, नाट्यदिग्दर्शक
Comments are closed.