साई सुदर्शन नावाचं वादळ लंकेत धडकलं! पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना झाला घात, ऋतुराजनेही अचा
श्रीलंका अ विरुद्ध भारत अ, दुसरी अनधिकृत कसोटी : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचा पहिला डाव 366 धावांवर आटोपल्यानंतर भारताने फलंदाजीत दमदार सुरुवात केली. सलामीवीर साई सुदर्शन याने खेळलेल्या 168 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारत अ संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, या दिमाखदार खेळीदरम्यान सुदर्शनचे द्विशतक अवघ्या 32 धावांनी हुकले. आतापर्यंत भारत अ संघाने पहिल्या डावात 107 षटकांत 4 बाद 414 धावा करून सामन्यावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
साई सुदर्शनचे द्विशतक हुकले, पडिक्कलची 94 धावांची साथ
भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अमन मोखडेने 48 चेंडूत 38 धावा केल्या. त्याने सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. मोखडे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या देवदत्त पडिक्कलने साई सुदर्शनला उत्तम साथ दिली. दोघांनी श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी रचली. देवदत्त पडिक्कलचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले, त्याने 152 चेंडूंत 11 चौकारांसह 94 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला साई सुदर्शनने आपले शतक पूर्ण करत द्विशतकाच्या दिशेने कूच केली होती. मात्र, 267 चेंडूंत 22 चौकारांच्या मदतीने 168 धावा करून तो दिलुम सुदीराच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ऋतुराज गायकवाडने अचानक का सोडलं मैदान? फलंदाजी करताना नेमकं काय घडलं?
फॉर्मात असलेला भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड फक्त 13 धावांवर खेळत असताना अचानक मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा पहिला डाव सुरू असताना देवदत्त पडिक्कल 94 धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड मैदानात उतरला. त्याने खेळपट्टीवर सेट होत 42 चेंडूंचा सामना केला आणि 13 धावा केल्या. साई सुदर्शनसोबत त्याने 42 धावांची भागीदारीही जोडली होती.
पण, फलंदाजी करत असताना अचानक ऋतुराजला स्नायूंच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला. कोलंबोमधील दमट हवामानामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. फिजिओ मैदानावर आले, त्यांनी प्राथमिक उपचार केले, परंतु ऋतुराजला पळताना आणि फटके मारताना प्रचंड त्रास होत होता. अखेर, दुखापत गंभीर होऊ नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून संघ व्यवस्थापनाने त्याला रिटायर हर्ट होऊन मैदान सोडण्याचा सल्ला दिला.
भारतीय संघासाठी दिलासा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) दृष्टीने भारतीय वरिष्ठ संघाला आगामी काळात श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. अशा परिस्थितीत साई सुदर्शनने श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर धावांचा पाऊस पाडणे ही टीम इंडियासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय कसोटी संघात अद्याप सुदर्शनला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठ्या खेळीची गरज होती. मात्र, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पुरेसे डाव दिले जातील. या कामगिरीमुळे सुदर्शनने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सारांश जैन आणि गुरनूर बरार यांच्या घातक गोलंदाजीनंतर (प्रत्येकी 4 बळी) आता भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.