Ratnagiri News – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामाने कोळंबे हायस्कूल धोक्यात, 400 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे कोळंबे परिसरातील ‘श्रीमती कमळाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज’च्या इमारतीसमोर गंभीर धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शाळेलगत मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याने शाळेच्या इमारतीचा पाया कमकुवत झाला असून, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीला तडे जाण्यासोबतच भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे.
यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे संस्थाचालक आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्गाच्या बाजूला संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) उभारावी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्य जलनिस्सारण व्यवस्था करावी, अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.