रोखठोक – टॉलस्टॉयचे म्हातारे धावत आहेत!
टॉलस्टॉयच्या कथेतील म्हातारा जमिनीच्या अति हव्यासापोटी धावत राहिला व शेवटी कोसळून गतप्राण झाला. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याप्रमाणे धावत सुटले आहेत. तेही कोसळतील!
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे राजकारण्यांना नशामुक्ती केंद्रात भरती करणे ही भारतीय लोकशाही आणि संविधानाची गरज आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनाही अशाच प्रकारच्या उपचारांची गरज आहे, पण दिल्लीतील हे दोन्ही नेते उपचार करण्याच्या पलीकडे पोहोचले आहेत. आमदार, खासदार विकत घेण्याचे, पक्ष फोडण्याचे व त्यानंतर पत्रकार परिषदेत रावणाप्रमाणे विकट हास्य करण्याचे व्यसन या सगळ्यांना जडले आहे. आमदार फोडायचे व पत्रकार परिषदेत विकट-विकृत हसत दाढीवर हात फिरवायचा. हा रोग आहे. महाराष्ट्रात शिंदे यांची अवस्था टॉलस्टॉयच्या कथेतील त्या हावऱ्या म्हाताऱ्यासारखी झाली आहे. ही गोष्ट बकासुरासारखी आहे. एका छोट्यागावात राहणारा म्हातारा शेतकरी, तो ‘टांगा’ चालवून उदरनिर्वाह करीत होता. नेहमीच असंतुष्ट दिसायचा. त्याच्या मालकाने त्याला कितीही दिले तरी त्याला ते कमीच वाटायचे. जे आहे ते पुरेसे नाही या भावनेने तो रात्रभर तळमळत पडायचा. इतरांची संपत्ती, जमीनजुमला पाहून तो मनातल्या मनात जळत असे. एक दिवस त्याला कळले की, बाजूच्या गावात खूप स्वस्तात जमीन मिळते. त्याने स्वतःचे गाव सोडले व तो दुसऱ्या गावात गेला. त्या गावाच्या प्रमुखांना भेटला. त्यांच्या अटी विचित्र होत्या. त्यांनी सांगितले, “एका दिवसात तू जेवढी जमीन फिरून येशील, तेवढी जमीन तुझी. फक्त सकाळी सूर्य उगवल्यावर चालायला सुरुवात करायची आणि सूर्य मावळताच इथे परत यायचं. जिथून चालायला सुरू करशील, तिथेच तू परत यायला हवं. जेवढी जमीन फिरशील तेवढी जमीन तुझी.” त्या हावरट म्हाताऱ्याला आनंद झाला. तो मनात म्हणाला, “एका दिवसात मी इतकी जमीन काबीज करीन की, इकडचा सर्वात मोठा भूस्वामी होईन.” दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच तो चालू लागला. त्याला वाटले, चालत राहिल्याने नुकसान होईल. मग तो धावत राहिला. धावण्याचा वेग म्हणजे ‘लालच’ वाढू लागली. तो चारही बाजूला सैरावैरा माथेफिरूप्रमाणे धावू लागला. आणखी हवे, आणखी हवे म्हणून तो दूर दूर धावत गेला. दुपारी त्याने जेवणही घेतले नाही. जेवणाच्या वेळेत धावून अधिक जमीन मिळवता येईल असे त्याला वाटले. सूर्य मावळला. त्याला वाटले, आपण खूपच जमीन मिळवली. आता परत मागे यावे लागेल, पण अंधार वाढला, तो घाबरला. तो परतीच्या प्रवासात धावू लागला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या. पाय लटपटू लागले. तरीही धावला. शेवटच्या क्षणी कसाबसा तो गावाच्या वेशीवर येऊन कोसळला, पण तो मेला होता.
त्याचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. गावच्या लोकांनी त्याला तिथेच पुरले. त्याच्या शरीराइतकीच जमीन त्याला मिळाली. सहा फूट लांब आणि दोन फूट रुंद. टॉलस्टॉयचा यावर संदेश स्पष्ट आहे. सत्ता, संपत्ती, जमीन, विकास निधी, राजकीय करीअरसाठी माणूस कितीही धावत राहो, फसवाफसवी करो. शेवटी तो कोसळून पडतो. त्याला फक्त सहा फूट जमीन लागते.
अति हावरटपणा माणसाला नष्ट करतो. एकनाथ शिंदे सध्या टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे धावत सुटले आहेत. शिंदे कोसळतील तेव्हा मोदी, शहा, फडणवीस सहा फूट जमीनही देणार नाहीत.
पवारांनी सर्व दिले
मोदी आणि शहांना देशातील सर्वच राजकीय पक्ष फोडायचे आहेत. त्यांचाही टॉलस्टॉयच्या कथेतला धावणारा म्हातारा झाला आहे. शिवसेनेचे सहा खासदार फोडले, आता आमदार सचिन अहिर गेले. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेत आले (फोडले) ते काही संत-सज्जनांचे कार्य पुढे नेण्यासाठी नक्कीच नाही. अहिर यांना पवारांनी सर्व काही दिले. मानप्रतिष्ठा, सत्ता, सुरक्षा. तरीही ते फुटले तेव्हा शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते. अहिर फुटले तेव्हा दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होते. अहिर फुटले व शिवसेनेत आले हे मी श्री. पवार यांना सांगितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला जाणवली. “मी त्याला काय द्यायचे बाकी ठेवले होते? सर्व काही दिले,” असे ते म्हणाले. पुढे अनेक दिवस सार्वजनिक कार्यक्रमांत पवार हे सचिन अहिर यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो विश्वासघात होता. तोच विश्वासघात अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केला. फडणवीस-शिंदे यांचे राजकारण हे विश्वासघातकी, बेइमान निर्माण करण्याचे आहे. त्यामुळे राज्यात विश्वासघाताचे पीक ते काढत आहेत. रश्मी पुराणिक यांनी समाज माध्यमांवर या विश्वासघाताबद्दल मत व्यक्त केले. ते सगळ्यांनाच लागू पडते. त्या म्हणतात, “सचिन अहिर हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2019 विधानसभा निवडणुकीआधी अचानक सकाळी उठून ते शिवसेनेत आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तडफडत म्हणाले, झोपलेल्या, बेसावध माणसाच्या डोक्यात दगड घालून ते गेले. आज तोच दगड भल्या सकाळीच बेसावध शिवसेनेच्या डोक्यात घालून अहिर शिंदे गटाकडे गेले. अहिर यांनी आपला रेकार्ड कायम ठेवला.” या सगळ्यात सचिन अहिर यांची चूक नाही. अहिर यांच्यासारख्यांमुळेच राजकारण अडते व शिवसेनेसारखे पक्ष थांबतात असे ज्यांना वाटते त्यांची चूक मोठी. शिवसेनेचे संघटन आजही भक्कम आहे व ते आयाराम-गयाराम यांच्यासारख्यांमुळे नाही, तर सामान्य जनता व शिवसैनिकांच्या पाठबळामुळेच ते आजही भक्कम आहे. सचिन अहिर यांचा पराभव वरळी मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी केला होता तेव्हाच अहिर यांच्या राजकीय कारकीर्दीस पूर्णविराम लागला होता. मात्र शिवसेनेने अहिरांना जीवदान दिले, आमदार केले. ते अहिर यापुढे ठाकरे व शिवसेनेविरुद्ध उभे ठाकतील.
व्यक्तिगत द्वेष
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण नासवायला निघाले आहेत. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. एकनाथ शिंदे हे व्यक्तिगत द्वेषाने पछाडले आहेत व या द्वेषाला काडी लावण्याचे काम दिल्लीतील त्यांचे मालक रोज करत आहेत. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृतीशी या लोकांना काहीच देणेघेणे नाही. महाराष्ट्र पूर्णपणे बुडवायचे काम दिल्ली करत आहे व दिल्लीला रसद पुरवण्याचे काम फडणवीस, शिंदेंसारखे मराठी राजकारणी करत आहेत. या पापात सहभागी होणाऱ्यांना कोणताही स्वाभिमान राहिलेला नाही. फडणवीस यांच्या भोवती व्यापारी, बिल्डर आणि शिंदे यांच्या भोवती ठेकेदार व गुंड टोळ्या उघडपणे घेराबंदी करून उभ्या आहेत. सत्ता याच टग्यांसाठी राबवली जात आहे. जे खासदार फुटले त्यांनी असे कोणते राष्ट्रीय सुरक्षेचे कार्य केले की, त्यांना सशस्त्र पोलीस गाड्यांची सुरक्षा सरकारने द्यावी? हे खासदार शिवसेनेत असताना मुख्यमंत्री फडणवीस त्यांना भेटत नव्हते, निधीचा दमडा देत नव्हते, मात्र तेच खासदार ‘फुटून’ शिंदेंकडे जाताच मुख्यमंत्री त्यांना स्वतःच्या चेंबरमध्ये बोलवून सन्मानाने निधी देतात. जणू हा निधीचा पैसा शिंदे-फडणवीस स्वतःच्या शेतातून निर्माण करतात. बेइमानीला हे उघड उत्तेजन आहे. सचिन अहिर हे 30 जूनला सकाळी 11.30 पर्यंत शिवसेनेच्या बाकावर बसले. तेथून उठले व शिंदे गटातर्फे उपसभापतीपदाचा अर्ज भरायला निघाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बेइमान वरातीत सामील झाले. छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला हे लोक कोणता संदेश देत आहेत? महाराष्ट्र आता स्वाभिमान्यांचा राहिला नसून बेइमान लोकांचा झाला आहे आणि सरकार या बेइमानांच्या पाठीशी ठाम उभे आहे.
शिवसेना कोणाची?
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर चक्क दरोडा घातला. अमित शहा हे त्या दरोड्याचे खरे सूत्रधार. शिंदे यांचे विश्वासघाताचे राजकारण पैशांवर व अमित शहांच्या पाठिंब्यावर सुरू आहे. या अनैतिक कार्यास ते हिंदुत्वाचा मुलामा देत आहेत. शिंदे यांनी आधी स्वतःचा पक्ष काढावा व मग हिंदुत्व, स्वाभिमानाच्या गप्पा माराव्यात. शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन शिंदे गटाने साजरा केला. ही दिवाळखोरी आहे. त्याआधी अमित शहांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात शिंदे यांना एकमेव शिवसेनाप्रमुख म्हणून घोषित केले व महाराष्ट्र, मराठी माणसाची थट्टा केली. सत्य असे की, शिंदे यांचा एक गट आहे व तो साडेतीन वर्षांचा आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांची ही अनौरस संतती आहे. ही अनौरस संतती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या संस्काराचा पाया उखडून टाकत आहे. अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचे आहे व एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांचा रस्ता अनैतिक व भ्रष्ट आहे. ते धावत आहेत, धावत राहतील.
टॉलस्टॉयच्या कथेत एक म्हातारा होता. भारतातील राजकारणात म्हातारे वाढले आहेत. सध्या दिल्लीत दोन व महाराष्ट्रातही दोन आहेत. त्यांनी धावत राहिले पाहिजे.
लवकरच कोसळण्यासाठी.
टॉलस्टॉयच्या कथेतील म्हाताऱ्याप्रमाणे हे सगळे कोसळतील. तो दिवस दूर नाही.
ट्विटर – @rautsanjay61
Gmail- [email protected]
Comments are closed.