काश्मीरमध्ये ‘तोयबा’चे दोन दहशतवादी ठार शोपियानमध्ये चकमक : सुरक्षा यंत्रणांना मोठे यश
► वृत्तसंस्था श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील शोपियानच्या सैदपोरा भागात शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या जवानांनी लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबाचे प्रमुख हस्तक होते, अशी माहिती देण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जाहीर केलेल्या 14 दहशतवाद्यांच्या यादीत झाकीर अहमद घनी या एका दहशतवाद्याचा समावेश होता. दुसरा दहशतवादी झाकीरचा साथीदार लतीफ भट आहे. सुरक्षा नोंदींनुसार, झाकीर 2024 पासून लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे, तर लतीफ गेल्या वर्षी लश्कर-ए-तोयबात सामील झाला होता.
शोपियानमध्ये चकमक
शोपियानमध्ये झालेली चकमक शनिवार, 4 जुलै रोजी सायंकाळी 7:45 वाजता सुरू झाली. मात्र, अंधारामुळे रात्री चकमक आणि शोधमोहीम थांबवण्यात आली. रविवारी पुन्हा चकमक सुरू झाल्यानंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. शोपियानमधील सैदपोरा पायीनजवळील चानपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे संबंधित परिसराला वेढा घातला असता जवान दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेजवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार केला.
शोपियानमधील मीमंदर भागातील एका फळबागेत शुक्रवारी दुपारी लष्कराच्या कॅमेऱ्यात दोन दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली. लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अनेक तुकड्यांनी परिसराला घेराव घालत सायंकाळपर्यंत चार गावांमध्ये अलर्ट जारी केला.
अतिरिक्त सैन्य तैनात
लष्कराच्या विशेष दहशतवादविरोधी पथक, व्हिक्टर फोर्सने, फळबागेतील दाट झाडीतून पळून जाण्याचे सर्व संभाव्य मार्ग रोखण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले. याचदरम्यान लष्करी जवान त्यांच्या दिशेने पुढे सरसावले असता दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे लष्कराने प्रभावी प्रत्युत्तर दिले आणि चकमक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार झाकीर कुलगामचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
झाकीरचा संबंध पाकिस्तानशी संबंधित अनेक दहशतवादी हल्ल्यांशीही जोडला गेला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये, एनआयए न्यायालयाने त्याच्याविरोधात नोटीस बजावली होती. अलीकडेच, एप्रिल 2026 च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाशीही त्याचे नाव जोडले गेले होते.
14 स्थानिक दहशतवाद्यांपैकी 9 ठार, 5 जण अजूनही फरार
झाकीर घनीच्या मृत्यूची पुष्टी झाली असून तो सुरक्षा दलांकडून ठार झालेला नववा स्थानिक दहशतवादी ठरला आहे. झाकीर घनीसह ज्या 14 दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध झाली होती, त्यापैकी नऊ जण आतापर्यंत ठार झाले आहेत. मे 2025 मध्ये शोपियान आणि पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले होते. अजूनही पाच दहशतवादी फरार असून ते सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
Comments are closed.