रोनाल्डोचा सूर्य की यमालची पहाट? अंतिम सोळात दोन पिढ्यांची टक्कर, पोर्तुगाल-स्पेन लढतीत एकाचा अस्त निश्चित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फुटबॉलच्या आकाशात एक सूर्य अजूनही मावळायला तयार नाही आणि क्षितिजावरची एक पहाट आता थेट आकाशाचा ताबा मागतेय. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लामिन यमाल या दोन पिढय़ांना समोरासमोर उभे करणाऱ्या पोर्तुगाल-स्पेन महासंग्रामामुळे वर्ल्ड कपची अंतिम सोळाची फेरी अक्षरशः पेटणार आहे. एका बाजूला विक्रमांच्या साम्राज्याचा सम्राट, दुसऱ्या बाजूला भविष्याच्या सिंहासनाचा तरुण दावेदार. त्यामुळे प्रश्न केवळ उपांत्यपूर्व फेरीत कोण जाणार एवढाच नाही तर रोनाल्डोचा सूर्य पुन्हा तळपणार की यमालची पहाट एका युगाच्या मावळतीची घोषणा करणार, याकडे अवघ्या फुटबॉलविश्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

स्पेनने 32 संघांच्या फेरीत ऑस्ट्रियाचा 3-0 असा धुव्वा उडवत आपली ताकद दाखवली. मिकेल ओयारझाबालची गोलसमोरील धार, लामिन यमालचा वेग, पेद्रीची मध्यफळीतील आक्रमकता आणि दानी ओल्मोची बचावाच्या दोन रेषांमधील घुसखोरी ही स्पेनची प्रमुख शस्त्रे आहेत. चेंडूवर दीर्घकाळ वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्याला थकवणे आणि चेंडू गमावताच आक्रमक दबाव टाकणे हे त्यांचे मोठे शक्तिस्थान आहे. मात्र बचावपटू आक्रमणासाठी पुढे गेल्यानंतर मागे निर्माण होणारी मोकळी जागा हा त्यांचा कच्चा दुवा ठरू शकतो.

पोर्तुगालने क्रोएशियाला 2-1 ने नमवत अंतिम सोळात प्रवेश केला. रोनाल्डोच्या उपस्थितीबरोबरच ब्रुनो फर्नांडिसचा निर्णायक पास, वितिन्याचे चेंडूवरील नियंत्रण, युआन नेविसची धावपळ आणि नुनो मेंडेसचा वेग पोर्तुगालला अधिक धोकादायक बनवतो. विशेषतः स्पेनचा पहिला दबाव मोडण्यात वितिन्या आणि ब्रुनो यशस्वी ठरले, तर प्रतिहल्ल्यात पोर्तुगाल घातक ठरू शकतो

या सामन्यात यमाल विरुद्ध नुनो मेंडेस, पेद्री विरुद्ध वितिन्या आणि स्पेनची बचावरेषा विरुद्ध रोनाल्डो अशी अनेक छोटी युद्धे रंगतील. स्पेनची पासिंगची मैफल रंगणार की पोर्तुगालचा प्रतिहल्ला एका क्षणात तिचा बाजा वाजवणार, यावर निकाल ठरेल. अंतिम सोळातच एका संभाव्य विश्वविजेत्याचा मुकुट मातीत मिळणार, एवढे मात्र निश्चित!

Comments are closed.