लेबनॉनमधील ख्रिश्चन गावांना इस्रायलमध्ये सामील व्हायचे आहे? नेतान्याहूंच्या दाव्यावरून नवा वाद
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. दक्षिण लेबनॉनमधील काही ख्रिश्चन गावांना हिजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इस्रायलमध्ये सामील होण्याची इच्छा आहे, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. मात्र संबंधित गावांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून आपली लेबनीज ओळख आणि निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रविवारी ‘फॉक्स न्यूज’च्या एका कार्यक्रमात बोलताना नेतान्याहू म्हणाले की, दक्षिण लेबनॉनमधील काही ख्रिश्चन गावांनी इस्रायलमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इस्रायल या गावांचे हिजबुल्लाहच्या कट्टरपंथीयांपासून रक्षण करतो, तसेच जगातील इतर भागातही इस्रायल ख्रिश्चनांचे संरक्षण करत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा दावा करताना त्यांनी कोणत्याही विशिष्ट गावाचे नाव उघड केले नाही.
नेतान्याहूंच्या या दाव्यानंतर दक्षिण लेबनॉनच्या मार्जेयुन भागातील ख्रिश्चन गावांनी एक संयुक्त निवेदन जारी करून हा दावा फेटाळून लावला आहे. “आम्हाला दुसऱ्या कोणत्याही देशात सामील होण्याचा अधिकार नाही किंवा तसा निर्णय घेण्याची कायदेशीर ताकदही आमच्याकडे नाही. आम्ही आमची भूमी, आमची राष्ट्रीय ओळख आणि लेबनॉनच्या ध्वजाप्रती पूर्णपणे निष्ठावान आहोत,” असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.