2014 चा हिशेब चुकवण्यासाठी यजमान सज्ज, पुलीसिकच्या अमेरिकेसमोर डी ब्रुएनचा बेल्जियम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

घर आपलं, अंगण आपलं, गर्दी आपली आणि स्वप्नही आपलीच, पण दारात उभा आहे बेल्जियमचा ‘लाल सैतान’! वर्ल्ड कपच्या अंतिम सोळात यजमान अमेरिकेसमोर बेल्जियमचे आव्हान उभे राहिल्याने अंकल सॅमच्या उत्सवाला अचानक धोक्याची घंटा वाजली आहे. ख्रिस्तियन पुलीसिकच्या वेगवान पावलांनी अमेरिका 2014 चा हिशेब चुकता करण्यासाठी सज्ज झाली असली तरी समोर केव्हिन डी ब्रुएनचा धूर्त डाव आणि थिबो कोर्टुआची उंच भिंत आहे. त्यामुळे आता प्रश्न एकच की, अंकल सॅम दार घट्ट लावून लाल सैतानाला बाहेरच रोखणार, की तो पुन्हा घरात घुसून अमेरिकन स्वप्नांचा फडशा पाडणार.

अमेरिकेने बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाचा 2-0 पराभव करत अंतिम सोळात प्रवेश केला. ख्रिस्तियन पुलीसिकचा भन्नाट वेग, टायलर अॅडम्सची मध्यफळीतील धावपळ, सर्जिन्यो डेस्टच्या बाजूने होणाऱ्या आक्रमक चढाया ही यजमानांची खरी ताकद आहे. त्यातच घरच्या प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना अतिरिक्त ऊर्जा देईलच. मात्र तीन गोल करणारा फोलारिन  बालोगुन निलंबनामुळे अनुपस्थित असल्यास आक्रमणाची धार कमी होण्याचा धोका असून रिकार्डो पेपीवर मोठी जबाबदारी येईल.

तसेच बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने नमवत आगेकूच केली, पण या विजयाने त्यांच्या बचावातील भेगाही उघड केल्या. केव्हिन ब्रुएनचा एक अचूक पास संपूर्ण सामना फिरवू शकतो, तर थिबो कोर्टुआची गोलसमोरील भिंत अमेरिकेच्या आक्रमणाची मोठी परीक्षा घेईल. बेल्जियमचा अनुभव हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र असले तरी वेगवान प्रतिहल्ल्यांविरुद्ध अस्वस्थ होणारी बचावफळी हा कच्चा दुवा आहे.

त्यामुळे ही लढत पुलीसिकच्या वेगाची डी ब्रुयनेच्या बुद्धिमत्तेशी, अॅडम्सच्या ऊर्जेची, बेल्जियमच्या अनुभवाशी आणि पेपीच्या गोलभुकेची कोर्टुआच्या भिंतीशी असेल. अमेरिकेने पहिला गोल केला तर सिएटल ज्वालामुखी बनेल, बेल्जियमने सुरुवातीचे वादळ झेलले तर अनुभव यजमानांच्या स्वप्नांवर पुन्हा लाल फुली मारू शकतो.

Comments are closed.