Ratnagiri News – मंडणगड-शेवरे दरम्यान रस्त्यावर मोठमोठ्या भेगा, सर्व प्रकारची वाहतूक ठप्प; विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंडणगड तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा चिंचघर, शेवरे, आतले, वडवली आणि देव्हारे मार्गे मंडणगड रस्ता शेवरे-आतले गावांच्या दरम्यान अचानक खचला आहे. गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात सुरू असलेल्या सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे येथील जमीन पूर्णपणे भुसभुशीत झाली आहे. परिणामी, आतले गावानजीक शेवरे गावच्या हद्दीतील काझी कंपाऊंडजवळ मुख्य रस्ता मधोमध खचला असून, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. अचानक रस्ता खचल्याने आणि जमिनीला पडलेल्या या मोठ्या भेगांमुळे ही भूस्खलनाची तर सुरुवात नाही ना, अशी भीती स्थानिक रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.

सध्या या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. चिंचघर, शेवरे, आतले, वडवली परिसरातील नागरिकांना देव्हारे मार्गे मंडणगड येथे जाण्यासाठी, तसेच आतले-तोंडली मार्गे पालवणी आणि कांगवई-विरसई मार्गे दापोलीकडे ये-जा करण्यासाठी हा एकमेव मुख्य मार्ग आहे. मात्र, रस्ता खचल्याने या मार्गावरील एस.टी. बसेसच्या फेऱ्यांसह सर्व प्रकारची प्रवासी आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन पावसाळ्यात हा मार्ग बंद झाल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना दापोली आणि मंडणगडकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा सर्वाधिक फटका शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. नेहमी मंडणगड येथे शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर या रस्ता कोंडीमुळे मोठी समस्या उभी राहिली आहे. वाहतूक सेवा कधी पूर्ववत होणार, याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या खचलेल्या रस्त्याची पाहणी करावी आणि किमान तात्पुरती वाहतूक सुरू होईल यादृष्टीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी आता येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Comments are closed.