महाराष्ट्रात हाहाकार; दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक कोसळली! अवघ्या 67 दिवसांत तब्बल 6700 कोटींचा डोलारा वाहून गेला

महायुती सरकारचा भ्रष्टाचार आणि दलालीची आणखी एक ‘लिंक’ आज कोसळली. तुफानालाही तोंड देऊ शकणारा ‘अभियांत्रिकी चमत्कार’ असा गवगवा करत महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्यात आलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ची पहिल्याच पावसात ‘झोलखोल’ झाली. तब्बल 6700 कोटींचा डोलारा अवघ्या 67 दिवसांत वाहून गेला. सोमवारी पहाटे ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्याच्या तोंडावर 100 टन दरड कोसळली. या दरडीमुळे बोगद्याची संरक्षक भिंत ढासळली आणि या मार्गावरील पुलावर पडली. यात अनेक गाडय़ा ढिगाऱ्यापासून थोडक्यात वाचल्या. या घटनेमुळे हादरलेल्या प्रशासनाने मिसिंग लिंकवरील वाहतूक तातडीने बंद केली आहे.

पुणे जिह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी पावसाचा जोर अधिकच वाढला. घाटमाथ्यावर आणि लोणावळा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्ग आणि महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे मुंबई-पुण्याचा संपर्क काही काळ तुटला. मिसिंग लिंकवरही दरड कोसळली. या दरडीमुळे बोगद्यातून अक्षरशः पाण्याचे धबधबे वाहू लागले. क्रमांक दोनच्या बोगद्यात छताच्या भागातून डोंगरावरील राडारोडा पाण्याबरोबर खाली पडू लागला. त्यामुळे वाहनचालकांमध्ये घबराट उडाली. खबरदारी म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

एक्स्प्रेस वेवर सिमेंटचा खांब कोसळला!

एक्सप्रेस वेवर एका ठिकाणी सिमेंटचा खांब कोसळला. फूड मॉल परिसर, अमृतांजन पुलाजवळ रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

लोणावळ्यात 625 मिमी विक्रमी पाऊस

गेल्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 625 मिमी) पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी ओसंडून वाहत होते. किरकोळ दरडी कोसळल्यामुळे हा मार्गही बंद करण्यात आला. यामुळे लोणावळा घाट परिसरात वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या.

मंकी हिलजवळ रेल्वे रुळांवर दरड

बोरघाट (खंडाळा घाट) विभागातील ठाकूरवाडी आणि मंकी हिलजवळ पहाटे तीनच्या सुमारास मोठी दरड रेल्वे रुळांवर कोसळली. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सर्व तिन्ही लाइनवरील वाहतूक ठप्प झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने ‘डेक्कन क्वीन’, ‘इंद्रायणी’, ’सिंहगड’, ‘डेक्कन एक्सप्रेस’ आणि ‘प्रगती एक्सप्रेस’ यांसह 16 महत्त्वाच्या गाडय़ा रद्द केल्या. तर इतर लांब पल्ल्याच्या गाडया पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे प्रवास टाळा!

हवामान विभागाने मुंबई आणि पुणे घाट परिसरासाठी पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास पूर्णपणे टाळा आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. रस्त्यांवरील दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

खोपोलीजवळ रेल्वे रुळ खचला

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत-खोपोलीदरम्यान पहाटे 2.30 वाजता रुळावर दरड कोसळली. यामुळे रेल्वे ट्रक खचला. त्यातच डोलवली, लवजी येथे रुळाखालची खडी वाहून गेल्याने कर्जत-खोपोली रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प  झाली.

रस्ते लागले!

हा अभियांत्रिकी चमत्कार आहे. 240 किमी प्रतितास वेगाने वादळे आली तरी मिसिंग लिंकला काही होणार नाही. देशातला सर्वात उंच पूल, सर्वात रुंद बोगदे, देशात डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करून दाखवलंय.

मिसिंग लिंकवर फक्त दोनच खड्डे पडलेत.कोणतेही काम झाल्यानंतर पहिल्या पावसानंतर त्यावर दुसरी लेयर टाकतात. त्यात रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यात येते. या इंजिनियरिंगच्या गोष्टी आहेत. (4 जुलै 2026) निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे दरडी कोसळण्याच्या अशा घटना घडत आहेत. (6 जुलै 2026) – देवेंद्र फडणवीस

रस्ते बांधण्यासाठी आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आहे. स्पेस टेक्नॉलॉजीच्या मदतीने छायाचित्रण होते आणि देखरेख ठेवली जाते. – पंतप्रधान मोदी

हिंदुस्थानातील सध्याची रस्ते सुविधा अमेरिकेपेक्षाही चांगली आहे. – नितीन गडकरी

Comments are closed.