कर्जमाफीच्या विनंतीबाबत पडताळणीनंतर निर्णय

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार : कलबुर्गी दौऱ्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीबाबत पडताळणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. राज्यात अनेक वर्षांपासून कृषी कर्जमाफीची मागणी होत आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सर्वंकष विचार करून पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगितले.

मंगळवरी कलबुर्गी महसूल विभागातील जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यापूर्वी  कलबुर्गी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. शेजारील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. राज्यातही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल का, या पत्रकारांच्या प्रश्नावर  उत्तर देताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, कर्जमाफीबद्दल ठोस भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, कोणती कर्जे आहेत, कुठे आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहे याचा आढावा घेतला जाईल. नंतर कर्जमाफीबद्दल विस्तृतपणे बोलेन, असे सांगितले.

आढावा घेतल्यानंतरच दुष्काळी क्षेत्रांची घोषणा

दुष्काळग्रस्त क्षेत्र घोषित करण्यासाठी एक कायदेशीर चौकट आहे. सर्व काही कायदेशीर चौकटीतच केले जाईल. राज्यातील सर्व भागांमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संबंधित भाग दुष्काळी क्षेत्र म्हणून घोषित केला जाईल. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी कल्याण कर्नाटकात आलो आहे. येथील लोकांची आणि लोकप्रतिनिधींची भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी बैठक घेत आहे. दोन दिवसांत बेळगावला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेईन, असेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.

जनतेच्या समस्यांसाठी प्रजा सेवा खाते

जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी ‘प्रजा सेवा’ खाते स्थापन करून मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल. याद्वारे जनतेच्या तक्रारींची दखल करण्यासाठी आणि शक्य तितका न्याय देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कलबुर्गी येथील सर्किट हाऊस आवारात जनतेची निवेदनी स्वीकारली. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाची कमतरता असून आपण दुष्काळाने त्रस्त आहे. त्यामुळे आमचा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी विनंती केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, मी ही परिस्थिती स्वत: पाहण्यासाठी येथे आलो आहे. मी तुमची परिस्थिती समजू शकतो.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री प्रियांक खर्गे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, केकेआरडीबीचे अध्यक्ष आणि आमदार अजय सिंग, आमदार अल्लमप्रभू पाटील आणि आदी उपस्थित होते.

Comments are closed.