अमेरिका-इराण युद्धाचा पुन्हा भडका! शांतता करार रद्द केल्याची ट्रम्प यांची घोषणा; दोन्ही देशांचे एकमेकांवर भीषण हल्ले
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया केली जात असताना बुधवारी अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले. होर्मुझची सामुद्रधुनी येथे जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार रद्द केल्याची घोषणा नाटो शिखर परिषदेमध्ये केली. इराणसोबतचा करार आता संपला आहे. अमेरिकेची त्या देशासोबत कोणताही नवीन करार करण्याची इच्छा नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
अमेरिकेच्या हवाई दलाने इराणमध्ये तब्बल 80 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. या लष्करी कारवाईसोबतच अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेला विशेष परवाना तडकाफडकी रद्द केला आहे. अमेरिकेच्या या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर बहरिन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या 85 लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त मारा केला. इराणनने बहरिनमधील अमेरिकेचा पाचवा नौदल विभाग आणि कुवेतमधील अली अल सालेम या हवाई तळावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच अमेरिकेचे हायटेक एमक्यू9 ड्रोन पाडल्याचा दावाही इराणने केला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असेही इराणने म्हटले आहे. इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाचा भडका उडताच कच्च्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी वधारल्या आहेत. दरम्यान, माझ्या मते आता युद्धबंदी संपली आहे. इराणसोबत वेळ घालवणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करू शकतात, परंतु त्याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही, असे ट्रम्प यांनी नाटो परिषदेत म्हटले.
शेअर बाजार कोसळला, 8 दशलक्ष कोटी स्वाहा
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद हिंदुस्थानी शेअर बाजारावर उमटले. दिवसअखेर सेन्सेक्स 1677 अंकांनी घसरून 76,503 अंकांवर तर निफ्टी 516 अंकांनी घसरून 23,882 अंकांवर बंद झाला. मंगळवारी बाजार बंद होण्याआधी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 4,80,20,223.18 कोटी रुपये होते. ते आज 4,71,76,347.13 कोटी रुपये राहिले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना 8,44,586 कोटी रुपयांचा फटका बसला.
Comments are closed.