दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा ‘तो’ फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पाया

हिंगोली क्राईम न्यूज : कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच कायदा धाब्यावर बसवल्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड पोलीस दलात (Nanded Police) कार्यरत असलेल्या प्रशांत गजभारे या पोलीस कर्मचाऱ्याने पहिली पत्नी हयात असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेताच दुसरा विवाह थाटल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर हे लग्न थांबवण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला नवरदेवाच्या वेशातील या पोलिसानेच लग्न मांडवात अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Hingoli Crime News: फेसबुकवरील फोटोमुळे फुटले बिंग

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पोलीस दलातील कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा 2022 मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. त्यांना दोन वर्षांची एक चिमुकली मुलगी देखील आहे. संसार सुरू असताना त्यांच्यात कौटुंबिक वाद होत होते. मात्र, हे वाद सुरू असतानाच 5 जुलै रोजी फेसबुकवर (Facebook) आपल्या पतीच्या दुसऱ्या विवाहाचे फोटो पाहून शारदा गजभारे यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Hingoli Crime News: लग्न मंडपातच पत्नीवर हल्ला, गळा दाबण्याचा प्रयत्न

पती दुसऱ्या लग्नाच्या बेतात असल्याचे समजताच शारदा गजभारे या आपल्या नातेवाईकांसह तात्काळ वसमत शहराजवळील ‘कृष्ण मंगल कार्यालयात’ पोहोचल्या. त्यांनी पतीला दुसरे लग्न का करत आहे? असा जाब विचारत हा विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या, डोक्यावर बाशिंग आणि अंगावर नवरदेवाचा पोशाख असलेल्या प्रशांत गजभारे याने स्वतःच्या पहिल्या पत्नीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

Hingoli Crime News: मुकाट्याने पाहत राहिले वऱ्हाडी

हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या वेशातील पोलीस कर्मचारी महिलेला अमानुषपणे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो वऱ्हाडी आणि नातेवाईकांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला, मात्र कोणीही ती मारहाण थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.

Hingoli Crime News: पोलीस कर्मचाऱ्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल

या अमानुष मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी हिंगोलीच्या वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे याच्यासह इतर 12 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हक्कासाठी शारदा या सध्या दोन वर्षांच्या चिमुकलीला कडेवर घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. “मला न्याय मिळावा आणि माझ्या दोन वर्षांच्या लेकीला तिचा बाप मिळावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण…; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!

Comments are closed.