दोन विचित्र अपघातांनंतर ट्रॅफिककोंडी, एक्स्प्रेस वेवर दोन ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एर्टिगा कार आणि कंटेनरमध्ये अपघात होऊन दोनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर ठाण्यातही एक महाकाय टँकर थेट रिक्षावर कोसळला. या विचित्र अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे. या घटनेनंतर टँकरचालक पसार झाला असून या दोन्ही अपघातानंतर एक्स्प्रेससह घोडबंदर मार्गावर काही काळ ट्रॅफिकचा जांगडगुत्ता झाला होता. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील माडप टनेलजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर एर्टिगा कार थेट कंटेनरला धडकली. या अपघातात कारमधील दोनजण जागीच ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी तसेच अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामधील जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रोडवरही अपघात झाला. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाणे येथून घोडबंदर मार्गाच्या दिशेने रासायनिक टँकर वाहतूक करत असताना आनंदनगर येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर बाजूने जाणाऱ्या रिक्षावर उलटला. या अपघातात रिक्षाचालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी अमजित अन्सारी हे जखमी असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनरचालक पसार
हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला. क्रेनच्या सहाय्याने टँकर रिक्षावरून बाजूला करण्यात आला. त्यानंतर टँकरखाली दबलेल्या दशरथ आणि मोहम्मद यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान कंटेनरचालक पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Comments are closed.