अटकेनंतर रमेश म्हात्रे अस्वस्थ झाले; त्यांच्या आजारपणाचे सर्टिफिकेट डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिले का? – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली. मात्र अटकेनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आदल्या दिवशी डॉक्टर, परिचारिकांना बेफामपणे मारहाण करणाऱ्याची पोलिसांनी अटक केल्यावर प्रकृती कशी बिघडते? त्यांच्या आजारपणाचे सर्टिफिकेट डॉ. श्रीकांत शिंदंनी दिले का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

गुरुवारी सकाळी संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. रमेश म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. अटकेनंतर गुंडांची प्रकृती बिघडते आणि त्यासाठी खोटी सर्टिफिकेट तयार केली जाता. मग त्यांना मस्तपैकी फाईव्ह स्टार रुग्णालयात ठेवले जाते. कल्याण-डोंबिवली भागात हे मोठ्या प्रमाणात चालते. आता रमेश म्हात्रे यांना हे आजारपणाचे सर्टिफिकेट डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले का हे पहावे लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आठ तासांपूर्वी बेफामपणे मारहाण करताना या माणसाची प्रकृती ठणठणीत होती. त्यांच्यामध्ये ऊर्जा होती. टणाटणा टेबलावर उड्या मारत होते. शिव्या घालत होते. पोलिसांनी अटक केल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे ज्या डॉक्टरांनी अशा प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले त्या डॉक्टरची आणि रुग्णालयाती ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. हे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र असून गुंडांची प्रकृती कधी बिघडत नाहीत. मुख्यमंत्र्यांना काही सत्कार्य करायचे असेल तर हे करावे, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.