आयसीसीची इंग्लंड क्रिकेटला नोटीस! बेन स्टोक्सच्या निवृत्तीशी संबधित

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना निवृत्तीची घोषणा केल्याचा त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) पत्र पाठवले आहे.

नॉटिंगहॅम स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी स्टोक्सने ड्रेसिंग रुममध्ये सहकाऱ्यांसमोर निवृत्तीची घोषणा केली. ईसीबीने या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारकाला दिला.

स्टोक्सच्या निवृत्तीची बातमी चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या समाप्तीआधी जाहीर करण्यात आली. त्यावेळी हा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. आयसीसीने आता ईसीबीला पत्र पाठवले असून त्यात म्हटले की, हे फुटेज प्रसिद्ध करणे हे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ‘प्लेअर ऍंड मॅच ऑफिशिअल्स एरिया’ (PMOA) साठी निर्धारित केलेल्या मानकांचे उल्लंघन आहे.

PMOA च्या कलम २.२.११ नुसार, इंग्लंडने हे सुनिश्चित केले पाहिजे की, व्हिडिओ किंवा ऑडिओ फुजेट प्रसारित करण्याच्या उद्देशाने संघांद्वारे वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही ड्रेसिंग रूममध्ये कोणतेही कायमस्वरुपी किंवा तात्पुरते व्हिडिओ कॅमेरे किंवा इतर रेकॉर्डिंग उपकरणे बसवलेली नाहीत.

आयसीसीने पत्रात म्हटले की, कसोटी सामना संपण्याआधी स्टोक्सच्या संभाषणाचे फुटेज प्रसारित करून ईसीबीने नियमांचे उल्लंघन केले आहे. आयसीसीने यापूर्वी ईसीबीला सल्लाही दिला. त्यांनी म्हटले की, PMOA मध्ये रेकॉर्ड केलेल्या कोणत्याही फुटेजमध्ये ऑडिओ नसावा. तसेच सामना संपण्याआधी ते प्रसिद्धही केले जाऊ नये.

आयसीसीच्या पत्राला ईसीबीकडून प्रतिसाद नाही
स्टोक्सच्या सामन्यादरम्यानच्या निवृत्तीच्या व्हिडिओ प्रसिद्ध करण्याबाबतचे आयसीसीच्या पत्रावर ईसीबी किंवा आयसीसी दोघांनीही कोणतेही निवेदन जाहीर केलेले नाही.

ईसीबीचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी खेळल्या गेलेल्या महिला टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याच्या केवळ एक दिवसाआधी आयसीसीने ईसीबीला हे पत्र पाठवले होते. (England Cricket receives ICC letter regarding Ben Stokes’ retirement)

Comments are closed.