जगातील पहिले बेसल इन्सुलिन भारतात दाखल मधुमेही रुग्णांना आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावे लागणार इंजेक्शन

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
डेन्मार्कमधील औषध कंपनी ‘नोवो नॉर्डिस्क’ने गुरुवारी भारतात अविकली (इन्सुलिन आयकोडेक) हे मधुमेहावरील इंजेक्शन लाँच केले. टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या इंजेक्शनच्या लॉन्चमुळे दररोज लागणाऱ्या 365 इन्सुलिन इंजेक्शन्सची गरज वर्षाला 52 इंजेक्शन्सपर्यंत कमी होईल.

भारतात इन्सुलिन सुरू करण्यातील विलंब कमी करणे हे ‘अविकली’चे उद्दिष्ट आहे. कंपनीने 700 युनिट्सचा पॅक 2,611 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. याचा अर्थ याची किंमत प्रतियुनिट 3.73 रुपये असेल. साहजिकच सध्याच्या डेली बेसल इन्सुलिनपेक्षा 30 ते 40 टक्के स्वस्त असल्याचे म्हटले जाते. जर एखाद्या रुग्णाला दररोज 10 युनिट्स इन्सुलिनची आवश्यकता असेल, तर त्यांना आठवड्यातून 70 युनिट्स इन्सुलिनची गरज लागेल, ज्याचा अंदाजे खर्च प्रति आठवडा 261 रुपये येईल.

‘अविकली’ हे फ्लेक्सटच पेन डिव्हाइसद्वारे आठवड्यातून एकदा दिले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे उपचारांचा भार कमी होईल, रुग्णांकडून औषधोपचाराचे पालन वाढेल आणि इन्सुलिन थेरपी सुरू करण्यामधील संकोच कमी होईल. हे इंजेक्शन पेन डिव्हाइस वापरून आठवड्यातून एकदा दिले जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये या औषधाने अनेक प्रकरणांमध्ये दैनंदिन बेसल इन्सुलिनच्या तुलनेत रक्तातील साखरेवर तितकेच किंवा त्याहूनही चांगले नियंत्रण मिळवल्याचे दाखवून दिले आहे. भारतातील मधुमेह उपचारांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आठवड्यातून एकदा डोस घेतल्याने रुग्णांवरील मानसिक आणि शारीरिक ताण कमी होईल, असे म्हटले जात आहे.

Comments are closed.