2029 ला आम्ही महाराष्ट्रातील हे भ्रष्ट सरकार उखडून फेकून देऊ – संजय राऊत
”2029 ला देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकून देणार” असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दार गटावर निशाणा साधला.
”अस्वस्थ वगैरे असणं मी मानत नाही. शिवसेनेचे सहा खासदार फोडले. तुम्ही मशाल चिन्हावर लढलात, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला व त्यामुळे तुम्ही निवडून आलात. शरद पवारांचा पक्ष तुतारी या चिन्हावर लढला व सात का आठ जागांवर खासदार निवडून आले. शरद पवार त्यासाठी राज्यभर फिरले. या सर्व खासदारांना जे मतदान झाले आहे ते मशाल व तुतारीसाठी झाले आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीला झालेले मतदान हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या विरोधात झाले आहे. मग अस्वस्थ का होताय? कुणाला घाबरताय? अस्वस्थ कुणी नसतं? मोदी शहा व इतर काही घटक दबावाचे राजकारण करतात व असे मासे गळाला लावतात. ते म्हणतात विकास निधी नाही म्हणून दुसरीकडे गेलो. यांना शंभर कोटी दिले तरी विकास करू शकत नाही. नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास करू शकले नाही, नागपूरात जाऊन विकास बघा. राज्यात कसला विकास कोसळतोय ते बघा. नांदेडला पूल कोसळला. पुण्यात मिसिंग लिंक कोसळला. रस्त्यांवर खड्डेच खड्डे, हा असला विकास”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी ”लोकांमध्ये राहायचं आणि पुढच्या निवडणूकीसाठी संघर्ष करायचा आणि सत्तेत येऊ हा विश्वास ठेवायचा. 2029 ला देशात इंडिया आघाडी सत्तेत येणार आणि महाराष्ट्रात आम्ही हे भ्रष्ट सरकार उखडून फेकून देऊ”, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
”उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळवताना व त्यानंतर त्यांच्याकडून प्रचार करून घेताना, निवडणूका जिंकून घेताना काही वाटलं नाही का? आम्ही सत्तेत असताना तुम्ही आमच्यासोबत आलात. तेव्हा यांना त्यांच्या साखर कारखान्यांची चिंता नाही वाटली का? एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला व ते भाजपसोबत गेले यासाठी आमचे त्यांच्याशी भांडण नाही. त्यांनी बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष चोरला हा वादाचा विषय आहे. माझ्यासारखा माणूस अशा गोष्टी विसरत नाही कारण आमचं अख्ख आयुष्य बाळासाहेबांसोबत गेलंय. ठाकरेंच्या पक्षाचे मालक, आईबाप तुम्ही कसे काय झालात? पार्थ पवार, सुनेत्राताई पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे हे कसे शरदपवारांच्या पक्षाचे आई बाप असू शकतात? बाप आहे ना तिथे सिल्व्हर ओक्सला बसलेले. त्यामुळे स्वाभिमानाची ठिणगी मनात असायला हवी, ती आमच्यात आहे”, असे देखील संजय राऊत म्हणाले.
”एकनाथ शिंदे काय शिकवतात आम्हाला कद्रूपणा? ज्या पक्षाने उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय कृतज्ञता ठेवली. शरद पवारांसारखी व्यक्ती जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतो तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. हेच मला वाटतं”, असेही ते म्हणाले.
Comments are closed.