Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या; मोठ्या अपघाताची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असून, संगमेश्वर येथील नवीन सोनवी उड्डाणपुलावरील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. रुंद आणि सरळ रस्त्यामुळे वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याच उड्डाणपुलाच्या उतारावर २५ ते ३० मोकाट गुरे रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांसमोर अचानक गुरे आल्यास चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे गुरांचा जीव धोक्यात येण्याबरोबरच वाहनचालक आणि प्रवाशांनाही गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांसाठी हा धोका अधिक गंभीर मानला जात आहे. अचानक समोर गुरे आल्यास अपघात होऊन कायमचे अपंगत्व किंवा जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महामार्गावर अशा प्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर संबंधित विभागाने तातडीने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि संगमेश्वरवासीयांकडून होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा तो होण्यापूर्वीच प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवीन सोनवी उड्डाणपुलावरील हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर निष्पाप नागरिकांसह मुक्या जनावरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन महामार्ग मोकाट गुरांपासून सुरक्षित करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

Comments are closed.