VIP दर्शनाला चाप; जिल्हाधिकाऱ्यांची मंदिर समितीला तंबी, शॉर्टकट दर्शनाला सोडणाऱ्यावर होणार गुन्हे दाखल…
व्हीआयपी दर्शनाच्या घुसखोरी बाबत दैनिक ‘सामना’ने पोलखोल करताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एन कार्तिकेयन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला व्हीआयपी दर्शनाला चाप लावण्याबाबत कडक शब्दांत तंबी दिली आहे. वारीच्या काळात कोणालाही व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करु नका, कोणी अशी व्यवस्था केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी एन कार्तिकेयन यांनी काढले आहेत.
दै. ‘सामना’च्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला कडक शब्दांत तंबी दिली आहे.
लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समिती सदस्यांच्या शिफारशीवर कोणालाही व्हीआयपी दर्शन देण्याची व्यवस्था करु नका, दबावापोटी कोणी असा प्रयत्न केल्यास दोघांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
या निर्देशाची चोख अंमलबजावणी व्हावी यासाठी मंदिराच्या व्हीआयपी दरवाजावर 24 तास सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही सुरु ठेवा. व्हीआयपी दर्शनासाठी कोणी आग्रह धरीत असेल आणि व्हीआयपी दर्शन देण्यासाठी कोणी पुढाकार घेत असेल तर दोघांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 56 प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पोलीस प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाला दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शन रांगेत उभा राहणाऱ्या भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शनाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
Comments are closed.