मोबाईल टॉर्चच्या उजेडात डॉक्टरांनी वाचवले दोन जीव, कर्तव्यापुढे अंधार हरला; कर्जतमधील दुर्गम मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
लाइट नसतानाही कर्जतच्या दुर्गम भागातील मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती करवंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका महिलेची सुखरूप प्रसूती केली आहे. डॉ. करवंदे व त्यांच्या टीमने कोणतेही कारण न देता चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात गंभीर अवस्थेतील मातेची प्रसूती यशस्वी करून बाळ आणि बाळंतिणीचा जीव वाचवला आहे. कर्तव्य प्रथम समजून अंधाराला हरवणाऱ्या डॉ. प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित होता.
त्यामुळे मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बॅटरी बॅकअपही पूर्णपणे बंद पडला होता. अशा परिस्थितीत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झालेल्या ज्योती मुकणे या वीटभट्टीवर काम करणाऱ्या गर्भवतीला मोहिली प्राथमिक केंद्रात आणण्यात आले होते.
धुवाधार पाऊस, प्रकृती गंभीर..
बाहेर मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणि रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविणे शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती करवंदे यांनी सहकारी डॉ. उत्कर्षा मनवर, आरोग्यसेविका अंकिता भोईर आणि सफाई कामगार दक्षता रुठे व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोबाईल टॉर्चच्या उजेडात प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
‘संकट कितीही मोठे असले तरी रुग्णाला वेळेत उपचार मिळणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ही प्रसूती यशस्वी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अडचणी येत असतात. नागरिकांनीदेखील समजून घ्यायला हवे. – डॉ. प्रीती करवंदे, वैद्यकीय अधिकार
Comments are closed.