FIFA World Cup 2026 – स्पेनकडून बेल्जियमच्या स्वप्नांचा चुराडा! मेरीनो ठरला तारणहार; आता फ्रान्सशी महासंग्राम
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत मिकेल मेरीनोने पुन्हा एकदा स्पेनचा तारणहार बनत बेल्जियमच्या आशांवर पाणी फेरले. मेरीनोने 88व्या मिनिटाला निर्णायक गोल झळकवला आणि स्पेनने बेल्जियमवर 2-1 अशी मात करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पेनसाठी मेरीनो सलग दुसऱया सामन्यात सुपर सब ठरला. अवघ्या दोन मिनिटांपूर्वी मैदानात उतरलेल्या आर्सेनलच्या या स्टारने चेंडूला दुसऱयाच स्पर्शात गोलजाळय़ाची दिशा दाखवत सामना स्पेनच्या झोळीत टाकला. आता मंगळवारी डलासमध्ये स्पेनची गाठ स्पर्धेतील बलाढय़ दावेदार फ्रान्सशी पडणार आहे.
स्पेनने 30व्या मिनिटाला फॅबियन रुईझ याच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. पेद्रो पोरोच्या अचूक पासवर दानी ओल्मोचा फटका कोर्ट्वाने अडवला, मात्र परत आलेल्या चेंडूवर रुईझने अचूक प्रहार करत स्पेनचे खाते उघडले.
मात्र, बेल्जियमने 41व्या मिनिटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. चार्ल्स डी केटेलारे याने टिमोथी कास्टाग्नेच्या क्रॉसवर शानदार हेडर झळकवत स्पेनच्या बचावफळीचा अभेद्य किल्ला भेदला. या गोलमुळे स्पेनची विश्वचषकातील सलग 649 मिनिटे गोल न स्वीकारण्याची विक्रमी मालिका अखेर खंडित झाली. अखेरीस मेरीनोच्या निर्णायक गोलने स्पेनने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि बेल्जियमचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले.
Comments are closed.