चार हजार सायकल वारकरी पंढरीत दाखल, हरिनामाचा जयघोष करीत गोल रिंगण आणि नगरप्रदक्षिणा केली पूर्ण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्रासह कर्नाटक येथून सायकलवर आलेल्या हजारो वारकऱ्यांनी आषाढी एकादशी पूर्वीच पंढरी नगरी हरी नामाच्या जयघोषाने दुमदुमून टाकली. चंद्रभागेचे स्नान, नामदेव पायरीचे दर्शन आणि रिंगण सोहळा पूर्ण करुन या सायकलिष्टनी आपली वारी पोहचती केली. निवृत्त आयपीएस पोलीस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून नाशिक ते पंढरपूर अशी पहिली सायकल वारी सुरु झाली होती. गेल्या दहा वर्षांत या सायकल वारीमध्ये कर्नाटकसह महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकलिष्ट मोठ्या उत्साहाने या वारीत सहभागी होत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे स्वागत केले.

वृक्ष लागवड, बेटी बचाव, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देत ही सायकल वारी पंढरीची वाट धरत असते. इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश या वेळी देण्यात आला.राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पहायला मिळाली.

यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी बैजल साहेब, राजेंद्र वानखेडे, ॲड श्रीनिवास वायकर, रवींद्र दुसाने, नाईक साहेब, अभिजीत कुलकर्णी, प्रकाश शेटे, महेश भोसले यांच्यासह पंढरपूर सायकलर्स क्लब व नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन केले होते.

Comments are closed.