व्हिएतनाम स्पीडबोट अपघात प्रकरणी कॅप्टनला अटक, 15 हिंदुस्थानी पर्यटकांचा झाला होता मृत्यू
व्हिएतनामनधील फु क्वोक बेटाजवळ शनिवारी स्पीडबोट उलटल्याने 15 हिंदुस्थानी पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी व्हिएतनामी पोलिसांनी रविवारी बोटच्या कॅप्टनला अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातानंतर अनेक पर्यटन कंपन्यांनी बेटांमधील आपली स्पीडबोट सेवा स्थगित केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हवामानात अचानक झालेल्या तीव्र बदलांमुळे घडलेली ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. अपघात घडण्यास कारणीभूत ठरलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल बोटच्या 57 वर्षीय कॅप्टनला अटक करण्यात आली आहे, असे दक्षिण ‘आन जियांग’ प्रांतातील पोलिसांनी सांगितले.
शनिवारी 32 हिंदुस्थानी पर्यटक, तीन व्हिएतनामी कर्मचारी आणि एक टूर गाइड यांना घेऊन जाणारी बोट ‘मे रुट न्गोई’ (May Rut Ngoai) बेटाजवळील खवळलेल्या समुद्रात उलटली. खलाशी आणि बचाव पथकाने 21 जणांना वाचवले, परंतु 15 प्रवाशांचा मृत्यू झाला.
बचाव कार्यात सहभागी असलेल्या खलाशांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेवेळी समुद्रात उंच लाटा उसळल्या होत्या, पण पाऊस पडत नव्हता. त्या भागात इतरही अनेक पर्यटक बोटी कार्यरत होत्या. अनेक लोक बुडालेल्या बोटीला धरून समुद्रात तरंगत होते आणि त्यांनी ‘लाइफ जॅकेट्स’ घातलेली नव्हती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
तरंगणाऱ्या लोकांना बोटीवर ओढून घेण्यासाठी दोरीसह लाइफबॉय (तरंगणारी साधने) फेकले. तसेच पीडितांना किनाऱ्यावर आणण्यासाठी ‘जेट स्की’चा वापर करण्यात आला, असेही पुढे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
हॅनोई येथील नवी दिल्लीच्या दूतावासाने रविवारी सांगितले की, अपघातातून बचावलेल्या 15 वाचलेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते हिंदुस्थानात परतत आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर फु क्वोक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments are closed.