Bay Of Bengal Earthquake बंगालच्या उपसागरात 4.5 रिश्टरचा भूकंप, आंध्र प्रदेशात अनेक भागांमध्ये जाणवले धक्के
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात रविवारी सकाळी भूकंप झाला. भूकंपमापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 5:05:46 वाजता भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.
भूकंपाचे केंद्र काकीनाडा या किनारपट्टीच्या शहरापासून समुद्रात 225 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते. विशाखापट्टणम शहर आणि आसपासच्या परिसराला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला.
लोकांची धावपळ
भूकंपाचे धक्के जाणवताच शहरातील अनेक भागांतील लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. प्राथमिक अहवालानुसार, राज्यात कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पहाटेच्या सुमारास लोक झोपलेले असताना भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांनी घाबरून आपली घरे सोडून मोकळ्या मैदानात येणे पसंत केले. तथापि, थोड्याच वेळात परिस्थिती सामान्य झाली.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. त्सुनामी किंवा मोठ्या भूकंपाचा कोणताही धोका नाही. या आपत्तीमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नसल्याने किनारपट्टी भागातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Comments are closed.